दुबई येथील युद्धजन्य परिस्थितीत जालगावचे सरपंच सुरक्षित

दापोली | प्रतिनिधी:
दापोली तालुक्यातील जालगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उद्योजक व भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी (महाराष्ट्र राज्य) सदस्य अक्षय फाटक हे सध्या कुटुंबियांसह दुबई येथे असून ते पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. कामानिमित्त ते दुबई येथे गेले असताना अचानक निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तेथेच थांबावे लागले आहे.

अक्षय फाटक यांच्यासोबत त्यांची कन्या श्रिया फाटक आणि आत्या शुभदा साठे या देखील दुबईमध्ये आहेत. दरम्यान, इस्राईल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दुबईमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी सुरक्षाविषयक घटना घडल्याने विमानतळावरील उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

अक्षय फाटक यांच्याशी संपर्क साधला असता, “आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत. कोणतीही घाबरण्याची गरज नाही. परिस्थितीवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे,” असे त्यांनी सांगितले. सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत सर्व भारतीय नागरिक असून प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले जात आहे.

दरम्यान, दापोली येथे असलेल्या त्यांच्या पत्नी स्नेहा फाटक यांनीही कुटुंब सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे. तसेच दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे यांनी संबंधित दूतावासाशी संपर्क साधण्यात आल्याचे सांगितले. पुढील सूचना मिळेपर्यंत संबंधितांनी सुरक्षित स्थळीच थांबावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
दुबईस्थित भारतीय नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये, असे आवाहन भारतीय दूतावासाने केले असून सर्वतोपरी मदत व सुरक्षा पुरविण्यात येईल, असेही जाहीर करण्यात आले आहे.