आमच्या महाराजांच्या स्मारकाबद्दल त्यांच्या तोंडात शब्द शोभत नाहीत
आ. निलेश राणे यांची सपकाळ यांच्यावर जहरी टीका
चिपळूण (प्रतिनिधी):- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ टिपू सुलतानचे अवलाद आहेत. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर बोलू नये, आमच्या महाराजांच्या स्मारकाबद्दल त्यांच्या तोंडात शब्द शोभत नाहीत, अशी जहरी टीका कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी रविवारी चिपळूण दौऱ्यावर पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना केली.
काँग्रेसचे गेल्या तीन दिवसांपासून चिपळूणमध्ये नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद निवडणूक लढवलेल्या उमेदवारांसाठी निवासी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कसबा येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल प्रश्न उपस्थित करत सरकारवर टीका केली. या संदर्भात पत्रकारांनी आमदार निलेश राणे यांना विचारले असता ते म्हणाले की, आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाविषयी माहिती घेतलेली आहे. जमीन ३० एकर संपादित करीत आहोत. वाढीव जमीन लागत आहे, त्याची माहिती घेतली जात आहे. निधीची कमतरता नाही. या स्मारकाच्या उभारणीसाठी ५०० कोटींच्या निधीची मागणी केलेली आहे. सपकाळ यांनी आम्हाला सांगू नये. छत्रपती शिवाजी महाराज असोत, छत्रपती संभाजी महाराज यांचा महायुतीमध्ये मानसन्मान कसा ठेवायचा हे टिपू सुलतानच्या अवलादीने आम्हाला सांगू नये, अशी जहरी टीका आ. निलेश राणे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यावर केली.
यावेळी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य संदेश आयरे, माजी नगरसेवक परिमल भोसले यांच्यासह नगरसेवक व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.













