रत्नागिरीत पारा चढणार; आंबा-काजू बागायतदारांसह पशुपालकांना ‘अलर्ट’

तापमानात ४ अंशांपर्यंत वाढीचा अंदाज; कृषी विद्यापीठाकडून विशेष सल्ला प्रसिद्ध

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यात आगामी काही दिवसांत उन्हाचा चढा चटका जाणवण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या अंदाजानुसार, कमाल तापमानात हळूहळू २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होऊन ते ३६ अंशांपर्यंत पोहोचू शकते. या वाढत्या उष्णतेचा परिणाम पिकांवर आणि पशुधनावर होऊ नये, यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सविस्तर कृषी सल्ला जारी केला आहे.

वणव्यापासून बागांचे संरक्षण करा उष्णता वाढल्यामुळे जंगलात वणवा लागण्याची दाट शक्यता असते. हा वणवा आंबा किंवा काजू बागांमध्ये शिरून मोठे नुकसान करू शकतो. त्यामुळे बागायतदारांनी तातडीने बागेभोवती ठराविक अंतरावर वणवा निरोधक पट्टे काढावेत, असा सल्ला देण्यात आला आहे.

फळबागांचे सिंचन आणि व्यवस्थापन

  • आंबा: फळधारणा झाली असल्यास प्रति झाड १५० ते २०० लिटर पाणी १५ दिवसांच्या अंतराने द्यावे. फळांना ‘सनबर्न’पासून वाचवण्यासाठी वर्तमानपत्राच्या पिशव्यांचे आवरण घालावे.

  • काजू: पक्व झालेल्या काजू बी आणि बोंडूची दोन दिवसाआड वेचणी करावी. बिया स्वच्छ धुवून तीन दिवस उन्हात नीट वाळवाव्यात

  • नारळ व सुपारी: नवीन लागवड केलेल्या लहान रोपांना उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून सावलीसाठी शेडनेट किंवा झावळ्यांचा वापर करावा.

भाजीपाला व कलिंगड संरक्षण वाढत्या उन्हामुळे कलिंगडाच्या फळांना तडे जाऊ शकतात किंवा डाग पडू शकतात. हे टाळण्यासाठी फळे भाताच्या पेंढ्याने किंवा गवताने झाकून ठेवावीत. वांगी, टोमॅटो आणि मिरची या पिकांना जमिनीच्या मगदुरानुसार ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

जनावरांना उष्माघातापासून वाचवा तापमान वाढत असल्याने पशुधनाला दिवसभर स्वच्छ आणि थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. उन्हाचा ताण कमी करण्यासाठी जनावरांच्या चाऱ्यावर गुळ आणि मिठाचे द्रावण शिंपडावे. दुपारच्या वेळी जनावरांना चरण्यासाठी बाहेर न नेण्याचे आवाहनही विद्यापीठाने केले आहे.