डेक्कन परिसरात फूटपाथ अडवणाऱ्यांवर कारवाई; 40 फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल

जेएम रोड ते कर्वे रोडपर्यंत पोलिसांची मोहीम
वाहतूक व पादचाऱ्यांना अडथळा; बीएनएस कलमान्वये कारवाई

पुण्यातील डेक्कन परिसरात फूटपाथ आणि रस्त्यावर स्टॉल लावून अडथळा निर्माण करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शनिवार आणि रविवारी विशेष मोहीम राबवत 40 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आले. वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाल्याने ही कारवाई करण्यात आली. संबंधितांना यापूर्वीही इशारा देण्यात आला होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.


पुणे : डेक्कन जिमखाना पोलिसांनी शनिवार आणि रविवारी संयुक्त कारवाई करत जेएम रोड, एफसी रोड, भांडारकर रोड, कमला नेहरू पार्क परिसर, शिरोळे रोड, कर्वे रोड आणि खिलारेवाडी रोड येथे फूटपाथ आणि रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या स्टॉलचालक व फेरीवाल्यांविरुद्ध 40 एफआयआर नोंदवले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांनी प्रहार डिजिटलशी बोलताना सांगितले की, शनिवारी दुपारपासून सुरू झालेली कारवाई रविवारी संध्याकाळपर्यंत सुरू होती. संबंधितांना काही आठवड्यांपूर्वी इशारा देण्यात आला होता; मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने गुन्हे दाखल करण्यात आले. ही प्रकरणे पुढील सुनावणीसाठी न्यायालयात पाठवली जाणार आहेत.

पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 285 अंतर्गत सार्वजनिक मार्गात अडथळा निर्माण करणे तसेच कलम 287 अंतर्गत निष्काळजी वर्तनाबाबत गुन्हे दाखल केले आहेत. संबंधित विक्रेते कॅरेजवे आणि फूटपाथवरच माल विक्री करत असल्याने वाहने आणि पादचाऱ्यांना अडचण निर्माण होत होती.

अनेक स्थानिक रहिवाशांनी तक्रारी केल्यानंतर पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली. या अतिक्रमणामुळे अपघाताचा धोका वाढत असल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे. पुढील काळातही अशीच कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.