होळीपूर्वी मोठी कारवाई; पुणे ग्रामीण पोलिसांचा सापळा
निर्जन शेतात ठेवलेले 465 पॅकेट सापडले; आरोपींचा शोध सुरू
पुणे ग्रामीण पोलिसांनी बारामतीजवळील जळोची गावात मोठी कारवाई करत 479 किलो गांजा जप्त केला आहे. दोन बंद ड्रममध्ये लपवून ठेवलेला हा मुद्देमाल सुमारे 2.39 कोटी रुपयांचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. होळीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गांजाची तस्करी वाढल्याचा संशय होता. गुप्त माहितीनंतर पोलिसांनी सापळा रचून हा साठा जप्त केला. प्रकरणी संबंधित आरोपींचा शोध सुरू असून तपास वेगाने सुरू आहे.
पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांनी शनिवारी मोठी कारवाई करत बारामतीजवळील जळोची गावातील एका शेतातून 479 किलो गांजा जप्त केला. हा साठा दोन बंद ड्रममध्ये ठेवण्यात आला होता. होळीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गांजाची तस्करी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
बारामती शहर पोलिसांचे निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी प्रहार डिजिटलशी बोलताना सांगितले की, परिसरात कडक नाकाबंदी, वाहनांची तपासणी आणि रात्रीची गस्त वाढवण्यात आली होती. त्यामुळे आरोपींनी संशय टाळण्यासाठी ड्रम शेतातच टाकून दिले असावेत.
शनिवारी संध्याकाळी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, मोठ्या प्रमाणात गांजा जळोची गावात साठवण्यात आला आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रतनदीप भंडारे यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी पोहोचले. शेतात आढळलेल्या दोन बंद ड्रमांना पोलिस ठाण्यात आणून उघडण्यात आले.
ड्रममध्ये 465 पॅकेट आढळून आली असून त्यामध्ये एकूण 479 किलो गांजा असल्याचे निष्पन्न झाले. या मुद्देमालाची बाजारातील किंमत सुमारे 2.39 कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधित जागा निर्जन असल्याने पोलिसांचा तपास चुकवण्यासाठी हा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सध्या जिल्ह्यातील गांजा तस्करी साखळीतील आरोपींचा शोध सुरू असून पोलिसांकडून तपास वेगाने पुढे नेला जात आहे.











