पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांची मागणी
रोरो सेवा स्वप्नपूर्ती बाबत मंत्री नितेश राणे यांचा केला विशेष सत्कार
मालवण | प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बहूप्रतीक्षित मुंबई विजयदुर्ग रो रो बोट सेवा सुरु झाली आहे. या बोटसेवेमुळे कोकणवासियांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. कोकणच्या पर्यटनाला ही अधिक चालना मिळणार आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी बोट प्रवासा दरम्यान मंत्री नितेश राणे यांचा सत्कार केला. दरम्यान, मालवण-वेंगुर्ले पर्यत रोरो बोट सेवेचा विस्तार करावा. अशी मागणीही अशोक सावंत यांनी मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.
कोकण बोटसेवा सुरु व्हावी, ही गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मार्गी लागली आहे.
पूर्वीच्या काळी बोट वाहतूक हेच कोकणच्या दळण वळणाचे मुख्य साधन होते. त्यावेळी मालवण, देवगड आणि वेंगुर्ला बंदरात आर्थिक सुबत्ता होती. मात्र जल वाहतूक बंद पडली. कोकणचे सुपुत्र मंत्री नितेश नारायणराव राणे यांना बंदर मंत्रालयाचा कार्यभार मिळाल्यानंतर कोकण ते मुंबई बोट सेवा सुरु करण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून ही बोट सेवा सुरु केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ आणि मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नामुळे कोकण वासियांचे स्वप्न साकार झाल्याबद्दल भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत यांनी कोकण बोट फेरीच्या शुभारंभावेळी मंत्री नितेश राणे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी कुडाळचे माजी नगराध्यक्ष विनायक राणे, योगेश चांदोसकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री नितेश राणे यांनी विशेष प्रयत्नातून ही बोट सुरु केली. ही बाब आम्हाला जिल्हा वासियांना अभिमानाची आहे. ही सेवा अशीच सुरु राहावी, सिंधुदुर्ग किनारपट्टीवर तिचा विस्तार व्हावा. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केला. त्यामुळे देशी, विदेशी पर्यटक इकडे दाखल होत असून ही बोटसेवा अशीच सुरु राहून संपूर्ण जिल्हावासियांना या सेवेचा लाभ होऊन येथील पर्यटनाचा फायदा होण्यासाठी टप्प्या टप्प्याने मालवण, देवगड, वेंगुर्ला येथ पर्यंत बोट सेवा विस्तारित करण्यासाठी जिल्हा वासियांच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांना लवकरच निवेदन सादर करणार असल्याचे ते म्हणाले.












