खेड, (प्रतिनिधी) : कोकणातील शिमगा उत्सव हा परंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा जपणारा सण म्हणून ओळखला जातो. खेड शहरात होळी पौर्णिमेच्या रात्री शेकडो वर्षांपासून जोपासली जाणारी ‘मढ’ काढण्याची अनोखी परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. ईडा-पीडा टळावी, शहरावर कोणतेही अनिष्ट येऊ नये आणि सर्वांचे कल्याण व्हावे, या भावनेतून ही प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली जाते.
खेड शहरातील श्री देवी पाथरजाई देवीच्या शिमगोत्सवात होम लागल्यानंतर हनुमान मित्र मंडळ व परिसरातील तरुण वर्गाने एकत्र येत मढ सजवले. एखाद्या खऱ्या प्रेतयात्रेप्रमाणे सर्व विधी पार पाडून हे प्रतीकात्मक मढ शहरातून काढले. “आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा” असे म्हणत अंत्ययात्रा संपूर्ण शहरातून फिरवली. काही ठिकाणी प्रेतयात्रा थांबवून लोक प्रतीकात्मक रडत-बोंबा ठोकत श्रद्धेची अभिव्यक्ती करतात. शहरातील सर्व अनिष्ट शक्ती दूर व्हाव्यात, हीच त्यामागची भावना असल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी सांगतात.
ही परंपरा गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळापासून अखंड सुरू आहे. पूर्वजांनी शहराची दृष्ट काढण्यासाठी आणि संकटांचा नायनाट व्हावा यासाठी होळीच्या दिवशी ही प्रथा सुरू केली, ती आजही तितक्याच श्रद्धेने पाळली जाते. ‘हुताशनीची प्रेतयात्रा’ असेही याला संबोधले जाते. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही आगळी-वेगळी परंपरा पाहण्यासाठी पुणे, मुंबईसह बाहेरगावाहून चाकरमानी खास येतात.
मध्यरात्री हजारो नागरिक, युवक आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र येऊन होळी साजरी करत असतानाच ही प्रथा मोठ्या शिस्तीत आणि श्रद्धेने पार पडते. अखेरीस संपूर्ण शहरातून फिरवलेले मढ देवी पाथरजाई देवीच्या होमामध्ये दहन केले जाते. या विधीमधून शहरातील इडा-पीडा बाहेर जावी आणि सर्वत्र सुख-समृद्धी नांदावी, अशी सामूहिक प्रार्थना भक्तांकडून करण्यात येते.
खेडची ही शंभर वर्षांची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने आणि श्रद्धेने जोपासली जात असून, शिमगा उत्सवाला यामुळे एक वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप प्राप्त झाले आहे.












