Gharda Institute of Technology मध्ये ‘सिनर्जी–२०२६’ उत्साहात संपन्न

खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील लवेल येथील घारडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘सिनर्जी–२०२६’ मोठ्या उत्साहात पार पडले. दिनांक २७ व २८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय कार्यक्रमात आनंद, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. अभियांत्रिकी व व्यवस्थापन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव मिळावा आणि त्यांची सर्वांगीण जडणघडण व्हावी, या उद्देशाने दरवर्षी या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या कला गुणांना व्यासपीठ देणाऱ्या ‘आर्ट गॅलरी’चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी चित्रकला, रांगोळी, छायाचित्रण, सुलेखन तसेच नैसर्गिक वस्तूंच्या माध्यमातून तयार केलेल्या आकर्षक कलाकृती सादर केल्या. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि सृजनशीलतेचे दर्शन या गॅलरीतून घडले.
त्यानंतर क्रीडा, सांस्कृतिक आणि विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, रजिस्ट्रार प्रा. एस. सी. मुनघाटे, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. एस. के. ढवळे व श्री. एस. जी. बोले, सर्व शाखा प्रमुख तसेच ‘सिनर्जी’चे समन्वयक श्री. विक्रमसिंह जाधव उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आल्याने त्यांच्या उत्साहात भर पडली.
दोन्ही दिवस चाललेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रेक्षकांची मने जिंकली. अंताक्षरी, नृत्य, गायन, वादन, फॅशन शो अशा विविध कार्यक्रमांमुळे वातावरण रंगतदार झाले. विशेष आकर्षण ठरले ते ‘ऑपरेशन सिंदूर’ या नाट्यप्रयोगाचे, ज्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
दुसऱ्या दिवशी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा दिला आणि विविध क्षेत्रातील अनुभव कथन केले. महाविद्यालयात पुन्हा एकदा जुन्या आठवणींनी रंग भरले. सर्वांसाठी चहापानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावर्षी विविध स्पर्धांमध्ये सर्वाधिक बक्षिसे पटकावत ‘जनरल चॅम्पियन्स ट्रॉफी’वर ए. आय. एम. एल. शाखेने आपली नोंद केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. ओंकार जरळी यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थी सचिव कु. वेदांत शिंदे व विद्यार्थीनी प्रतिनिधी कु. सई दळवी यांनीही मोलाचे योगदान दिले. सर्व विद्यार्थी प्रतिनिधी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे ‘सिनर्जी–२०२६’ उत्साहपूर्ण आणि अविस्मरणीय ठरला.