‘संगीत वीज म्हणाली धरतीला’ नाटकाला पाच वैयक्तिक पारितोषिके
संजय जोशी यांना रंगभूषा प्रथम तर बाळ पुराणिक नेपथ्य द्वितीय
आज्ञा कोयंडेला अभिनयाचे रौप्यपदक
सावंतवाडी | प्रतिनिधी:
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत सावंतवाडीच्या ‘क्षितिज इव्हेंट’ या संस्थेने आपल्या कलेचा ठसा उमटवला आहे. वि. वा. शिरवाडकर लिखित ‘संगीत वीज म्हणाली धरतीला’ या नाटकाने तांत्रिक आणि अभिनय अशा दोन्ही आघाड्यांवर यश संपादन करत एकूण पाच वैयक्तिक पारितोषिकांवर आपले नाव कोरले आहे.
सांगली येथील विष्णूदास भावे नाट्यमंदिर येथे ही स्पर्धा पार पडली. बुधवारी सादर झालेल्या या नाटकाने आपल्या प्रभावी सादरीकरणाने सांगलीकर रसिकांची मने तर जिंकलीच, पण परीक्षकांच्या पसंतीची पावतीही मिळवली.
संस्थेला पाच वैयक्तिक पारितोषिके मिळाली. यात अभिनय (रौप्यपदक): आज्ञा कोयंडे (राणी लक्ष्मीबाई यांच्या भूमिकेसाठी), रंगभूषा (प्रथम): संजय जोशी, नेपथ्य (द्वितीय): बाळ (दत्तात्रय) पुराणिक, वेशभूषा (द्वितीय): वैभवी पुराणिक तर प्रकाश योजना (तृतीय): अभिषेक कोयंडे यांनी या स्पर्धेत उज्वल यश संपादन केले.
शिरवाडकरांच्या लेखणीचा समर्थ आविष्कार
१८५७ च्या स्वातंत्र्यसमराची पार्श्वभूमी असलेल्या या नाटकात राणी लक्ष्मीबाई आणि त्यांच्या महिला सैनिकांचा पराक्रम उलगडण्यात आला. आज्ञा कोयंडे हिने साकारलेली राणी लक्ष्मीबाईंची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली. राणीचे शौर्य, मातृत्व आणि पराकोटीचा दृढनिश्चय तिने आपल्या अभिनयातून जिवंत केला, ज्याची दखल घेत तिला अभिनयाचे मानाचे रौप्यपदक बहाल करण्यात आले.
नाटकाचे दिग्दर्शन आणि नेपथ्य दत्तात्रय पुराणिक यांचे होते. ऐतिहासिक काळाला साजेसे नेपथ्य, वेशभूषा आणि चपखल प्रकाश योजनेमुळे १८५७ चा काळ रंगमंचावर हुबेहूब उभा राहिला. जुलेखाच्या भूमिकेत केतकी सावंत हिने आपल्या सुरेल गायकीने प्रयोगात रंग भरले, तर उमा जडये आणि कविता ओगले यांची साथही मोलाची ठरली.
श्री परमेश्वर निर्मित संगीत वीज म्हणाली धरतीला या लेखक कै. वि. वा. शिरवाडकर लिखीत नाटकाचे
दिग्दर्शक व कार्यकारी निर्माता तथा नेपथ्य बाळ पुराणिक यांनी केले. तर
संगीत मार्गदर्शन स्वप्नील गोरे,
प्रकाश योजना अभिषेक कोयंडे,
पार्श्वसंगीत गणेशप्रसाद गोगटे,
ऑर्गन स्वप्नील गोरे, तबला
निरज भोसले तर रंगभूषा संजय जोशी व वेषभूषा वैभवी पुराणिक यांनी केली.
तसेच रंगमंच व्यवस्था रावजी पार्सेकर, संजय पेडणेकर आणि सहकारी यांनी पाहिली. यात बाळ पुराणिक यांच्यासह विक्रम जांभेकर, सिद्धेश कुवळेकर, ज्ञानेश पाटकर, आज्ञा कोयंडे, उमा जड्ये, कविता ओगले, केतकी सावंत, सुधीर भागवत, आशुतोष चिटणीस, तेजस प्रभुदेसाई, गणेश दीक्षित, श्रीकांत वावदे, राजेश जाधव, संदीप धुरी आदी कलाकार सहभागी झाले होते.
सांस्कृतिक वर्तुळातून कौतुक
या यशाबद्दल राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आणि सांस्कृतिक सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी विजेत्या कलाकारांचे अभिनंदन केले आहे. कोकणातील एका संस्थेने राज्यस्तरीय संगीत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत इतक्या मोठ्या प्रमाणात पारितोषिके पटकावल्याने सावंतवाडीच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यातून ‘क्षितिज इव्हेंट’च्या टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.













