सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील विठ्ठल मंदिरच्या मागील बाजूच्या जिन्याखाली गेले कित्येक दिवस वास्तव्य करून असलेल्या निराधार जखमी व मरणासन्न अवस्थेतील वृद्धाला सामाजिक बांधिलकी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नवजीवन दिले. त्याला सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलीस सदर वृद्ध व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. सुरेश मेस्त्री हा ६५ वर्षीय निराधार वृद्ध केले अनेक दिवस विठ्ठल मंदिरच्या पाठीमागील जिन्यापाशी पडून होता. त्याच्या पूर्ण अंगाला जखमा होऊन औषधोपचार न झाल्यामुळे दुर्गंधी येत होती. तशाच जखमी व मरणासन्न अवस्थेत तो तिथेच पडून होता.
शनिवारी त्याची तब्बेत अधिकच खालावल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव यांना याबाबत कल्पना दिली. त्यानंतर रवी जाधव, शेखर सुभेदार, अशोक पेडणेकर, निखिल जाधव , दुर्गेश रेगे व सामाजिक कार्यकर्ते बाबलो डिचोलकर तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी सदर निराधार वृद्ध व्यक्ती पावसामध्ये भिजत बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेला आढळून आला. कार्यकर्त्यांनी त्याला पाणी पाजवून शुद्धीत आणलं त्यानंतर सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी त्याला स्वच्छ आंघोळ घालून खाण्यासाठी चहा बिस्कीट दिले. त्यानंतर सदर वृद्ध व्यक्ती पूर्णपणे शुद्धीत आल्यावर पोलिस कर्मचारी पी.एस.आय भागवत, होमगार्ड एस व्ही भांडीये, जी पी वेंगुर्लेकर यांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले.
उपचारानंतर सदर वृद्ध व्यक्तीच्या तब्येतीत सुधारणा झाली असून पोलीस सदर वृद्ध व्यक्तींच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. तोपर्यंत सदर वृद्ध व्यक्ती सामाजिक बांधिलकीच्या देखरेखेखाली आहे. दरम्यान, सदर व्यक्ती त्या काळचा बारावी पास आहे. त्याला दोन मुलगे असून दोन्ही कमावते आहेत अशी माहिती सामाजिक बांधिलकी प्राप्त झाली आहे. मात्र, खात्री झाल्यानंतरच त्याला कुटुंबीयांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती सामाजिक बांधिलकी संघटनेकडून देण्यात आली आहे.












