कालव्यामध्ये झाला लाखोंचा भ्रष्टाचार जयवंत माजळकर यांनी केली चौकशीची मागणी
संतोष कोत्रे | लांजा : प्रतिनिधी तालुक्यातील खोरनिनको साईबाबा नगर येथे पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आलेल्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून अवघ्या चार महिन्यातच कालव्याच्या बांधकामाला तडे गेले असून काही ठिकाणी ते बांधकाम तुटले देखील आहे .त्यामुळे या कामात लाखोंचा भ्रष्टाचार झाला असून या संपूर्ण प्रकरणाची शासनाने सखोल चौकशी करावी अशी मागणी येथील ग्रामस्थ जयवंत माजळकर यांनी केली आहे.
याबाबत ग्रामस्थ जयवंत माजळकर यांनी सांगितले की, खोरनिनको साईबाबा नगर या ठिकाणी धरणग्रस्त ग्रामस्थांची वस्ती असून या वस्तीच्या दक्षिणेला पाटबंधारे विभागामार्फत कालवा काढण्यात आला होता. मार्च २०२४ मध्ये या कालव्याचे काम पूर्ण झाले होते. मात्र लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कालव्याला जागोजागी तडे गेले असून गळती लागली आहे .तर काही ठिकाणी कालव्याचे बांधकाम देखील फुटले आहे. त्यामुळे अवघ्या चार महिन्यातच जर इतकी बिकट अवस्था होत असेल तर कामाचा दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कालव्याचे कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील जयवंत माजळकर यांनी केला आहे. मात्र लघु पाटबंधारे विभाग मात्र मुग गिळुन गप्प असल्याचे माजळकर म्हणाले.
कालव्याच्या कामासाठी लाखो रुपये खर्च केले जात असतील आणि अवघ्या चार महिन्यातच त्याची दुर्दशा होत असेल तर त्याला जबाबदार कोण ?हे संपूर्ण काम निकृष्ट दर्जाचे झाले असून याची सखोल चौकशी व्हावी अशी आपली मागणी आहे. यापूर्वी या ठिकाणी असलेले अभियंता स्वप्निल पुरी यांनी तर येथील ग्रामस्थांच्या जमिनीत दगड ,मातीचे ढिगारे टाकून जमिनींची वाट लावली असल्याचे माजळकर म्हणाले. या विरोधात मी कार्यकारी अभियंता पाटबंधारे बांधकाम विभाग रत्नागिरी, जिल्हाधिकारी रत्नागिरी, लांजा तहसीलदार यांच्याकडे देखील वेळोवेळी पत्र व्यवहार केला आहे. मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेले नाही. त्यामुळे आपण पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे जयवंत माजळकर यांनी सांगितले.











