राजापूरवासीयांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार
राजापूर | प्रतिनिधी : निधी अभावी रखडलेल्या राजापुरातील कोदवली येथील नवीन धरणाच्या उर्वरित बांधकामासाठी आवश्यक असणारा निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली आहे.
याबाबत विधानसभेत आमदार अमिन पटेल व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पॉईंट ऑफ इन्फरमेशनद्वारे प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर सभागृहात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकाराच्यावतीने ही ग्वाही दिली.
काँग्रेसच्या माजी आमदार अॅड. हुस्नबानू खलिफे व माजी नगराध्यक्ष अॅड.जमीर खलिफे यांनी यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून आता या धरणाचे काम निश्चित मार्गी लागणार आहे. तशी माहिती माजी आमदार अॅड. सौ. खलिफे यांनी पत्रकारांना दिली आहे.
राजापूर शहराला नैसर्गिकरित्या पाणीपुरवठा करणारे ब्रिटीशकालीन सायबाचे धरण आता जीर्ण झाले आहे. या धरणातुन मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गळतीमुळे शहरात मार्चपासूनच तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी याच ठिकाणी नवीन धरण बांधण्यात येत आहे. यासाठी माजी आमदार अॅड. खलिफे व माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष अॅड.जमीर खलिफे यांनी सातत्याने पाठपुरावा करून धरणाचे काम मार्गी लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी या धरणाच्या बांधकामासाठी दहा कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र या धरणाच्या कामाचे अंदाजपत्रक वाढल्याने हा निधी अपुरा पडला असून सध्या नवीन धरणाचे काम निधी अभावी रखडले आहे. यासाठी आणखी सुमारे सहा ते सात कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. हा निधी मिळविण्यासाठी पुन्हा एकदा अॅड. खलिफे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. यासाठी त्यांनी आ.पटेल व आ.चव्हाण यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली व याप्रश्नी विधानसभेत शासनाचे लक्ष वेधावे, अशी मागणी केली होती. तशी माहिती अॅड.सौ. खलिफे यांनी दिली.
याबाबत शुक्रवारी विधानसभेत आ.अमिन पटेल यांनी पॉईंट ऑफ इन्फरमेशनद्वारे प्रश्न उपस्थित केला होता. यापूर्वी आपणच या धरणाच्या कामासाठी निधी दिलेला असून आता उर्वरित कामासाठीही आवश्यक तो निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. राजापूरवासीयांसाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यामुळे पाणी प्रश्न सुटणार आहे, असेही त्यांनी नमूद केले. त्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील आ. पटेल यांच्या मागणीला दुजोरा देत शासनाने यासाठी आवश्यक तो सात कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी केली.
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाची तत्काळ दखल घेत या धरणाच्या उर्वरित कामासाठी आवश्यक तो निधी शासन नक्कीच उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही सभागृहात दिली.
अशा प्रकारे राजापुरातील या अपूर्ण धरणाच्या कामाबाबत विधानसभेत मुद्दा उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधल्याबद्दल अॅड.सौ. खलिफे यांनी आ.पटेल व आ.चव्हाण यांचे आभार मानले आहेत. तर उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी अपूर्ण कामासाठी निधी देण्याचे आश्वासन दिल्याने त्यांचेही अॅड. खलिफे यांनी आभार व्यक्त केले आहेत.












