रत्नागिरीत जेलरोडवर कारचालकाचा थरार; दोन दुचाकींना धडक देत तिघांना चिरडले

रत्नागिरी | प्रतिनिधी :
बेदरकारपणे कार चालवून पुढील दोन दुचाकींना धडक देत अपघात केला. या अपघातात तीन जण जखमी झाले. अपघाताची ही घटना मंगळवार 3 मार्च रोजी रात्री 8.45 वा.सुमारास जेलरोड येथे घडली.

सिध्दराज गजानन मयेकर (27, रा.शिरगाव मयेकरवाडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात अनिल सिंग विक्रमसिंग (23, मुळ रा. राजस्थान सध्या रा. शांतीनगर, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार,मंगळवारी रात्री अनिल विक्रमसिंग हा आपल्या ताब्यातील दुचाकी (आरजे-44-एसएफ-9967) वर पाठीमागे ओमप्रकाश मेघवाल याला बसवून आठवडा बाजार ते मारुती मंदिर असा जात होता. त्याच सुमारास सिध्दराज मयेकर हा आपल्या ताब्यातील कार घेउन मारुती मंदिरच्या दिशेने जात होता.

ही दोन्ही वाहने जेलरोड येथे आली असता सिध्दराजचा कारवरील ताबा सूटला आणि त्याने फिर्यादीच्या दुचाकीसह अन्य एका दुचाकीला धडक देत अपघात केला. यात अनिल विक्रमसिंग त्याच्या मागे बसलेला ओमप्रकाश मेघवाल, तसेच अन्य दुचाकीवरील बिल्किस नदीम दलाल (35, रा.नाताळ गल्ली राजीवडा, रत्नागिरी) हे तिघे जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.