राजापुरात ग्रामीण भागात बिबटयांचा मुक्त संचार सुरूच

देवीहसोळ मळेवाडीतील शेतकऱ्याची गाभण गाय केली बिबटयाने फस्त

राजापूर प्रतिनिधी :तालुक्यात बिबटयांचा मुक्त संचार ही नित्याचीच बाब झाली असून याचा फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसत आहे. तालुक्यातील देवीहसोळ मळेवाडी येथील शेतकरी शशिकांत सुर्वे यांची गोठयात बांधलेली गाभण गाय बिबटयाने गोठयात शिरून फस्त केली आहे. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे.,
या प्रकरणीं शशिकांत सुर्वे यांनी राजापूर वनविभागाकडे लेखी तक्रार केली असून वनपाल जयराम बावदाणे यांनी तात्काळ दखल घेत घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.
राजापूर तालुक्यात मोठया प्रमाणावर असलेले बिबटयांचे अस्तीत्व अधोरेखित झालेले आहे. अनेक भागात दिवसा व रात्री बिबटयांचे दर्शन होत आहे. या बिबटयांकडून शेतकऱ्यांच्या गुरांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे पशूधन धोक्यात आले आहे.
सुर्वे यांची बंदीस्त गोठयात बांधलेली गाभण गाय या बिबटयाने फस्त केली आहे. गोठयाच्या माळयावर प्रवेश करून तेथून गोठयात उतरून बिबटयाने ही गाय मारली आहे. यात सुर्वे यांचे मोठे नुकसान झाले आहे.
राजापूर तालुक्यात अशा प्रकारे राजरोसपणे फिरणाऱ्या व शेतकऱ्यांच्या जनावरांना फस्त करणाऱ्या या बिबटयांचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांतुन होत आहे.