कोमसाप जिल्हा मंडळ व कुडाळ शाखेचा स्तुत्य उपक्रम; ८ मार्च रोजी गौरव सोहळा
सावंतवाडी । प्रतिनिधी :
कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) सिंधुदुर्ग जिल्हा मंडळ आणि कोमसाप शाखा कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत आदर्शवत कार्य करणाऱ्या १७ कर्तृत्ववान महिलांचा ‘नारीशक्ती सन्मान गौरव’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा रविवार, ८ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये संपन्न होणार आहे.
सावंतवाडी येथील ‘पर्णकुटी’ विश्रामगृह येथे नुकतीच जिल्हा कार्यकारी मंडळाची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत पुरस्कारार्थींच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. कोकण मराठी साहित्य परिषद ही जिल्ह्यातील अग्रगण्य साहित्य संस्था असून, यावर्षीपासून जिल्ह्यातील नारीशक्तीचा गौरव करण्याचा एक आगळावेगळा निर्णय संस्थेने घेतला आहे.
विविध क्षेत्रांतील कर्तृत्वाचा गौरव
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक संवर्धन, वैद्यकीय, पत्रकारिता आणि महिला बचत गट अशा विविध स्तरांवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. “जिल्ह्याच्या विकासामध्ये महिलांची ताकद मोठी असून त्यांच्या प्रेरणेमुळेच येथील सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ एका वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. निवड झालेल्या १७ महिलांना सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात येणार आहे.
प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती
या सोहळ्याचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी देसाई यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा बँकेच्या संचालक नीता राणे आणि कोमसाप महिला विभाग प्रमुख सौ. वृंदा कांबळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के असतील.
नियोजनासाठी पदाधिकाऱ्यांची बैठक
सावंतवाडी येथील बैठकीस जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, सहसचिव सुरेश पवार, सदस्य भरत गावडे, विठ्ठल कदम, तालुकाध्यक्ष दीपक पटेकर, अभिमन्यू लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. कुडाळ शाखेच्या सहकार्याने हा कार्यक्रम भव्य स्वरूपात आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या गौरव सोहळ्याला जिल्ह्यातील साहित्यप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, कुडाळ तालुकाध्यक्ष संतोष वालावलकर आणि तालुका सचिव सुरेश पवार यांनी केले आहे.










