कायमस्वरूपी तोडग्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाची घेणार मदत
बारामती येथील ‘एडीटी’ संस्थेच्या माध्यमातून आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ड्रोन प्रणालीचा करणार वापर
४.५ कोटींचा निधी जिल्हा नियोजनातून उपलब्ध करून देणार शासन म्हणून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत लवकरच मिळणार
पालकमंत्री नितेश राणे यांचा पत्रकार परिषदेत विश्वास
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी सध्या निसर्ग आणि हवामान बदलामुळे मोठ्या संकटात सापडला आहे.बागायतदारांचे जवळपास ८५ टक्के नुकसान झाले आहे.सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबध्दच आहोत. ही मदत लवकरच जाहीर होईल. परंतू या हवामानाच्या बदलत्या संकटाला सामोरे कसे जावे? हापूसला विविध समस्यांतून मुक्त करताना कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. बारामती येथील अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट ‘एडीटी’ (ADT) संस्थेच्या माध्यमातून आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ड्रोन प्रणालीचा वापर करून आंबा शेतीचे व्यवस्थापन केले जाईल, अशी घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केली. या हंगामात आंबा शेतकऱ्यांची नुकसानी हा विषय सिंधुदुर्ग जिल्ह्याची नुकसानी म्हणून तो आम्ही हाताळत आहोत. निश्चित पद्धतीने शासन म्हणून जी आपल्याला मदत हवी आहे.ती सगळ्या पद्धतीची मदत केली जाणार आहे, हा विश्वास जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला देतोय असेही पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
कणकवली प्रहार भवन येथे मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली.यावेळी बोलताना ते म्हणाले,जिल्ह्यातील ३४,२९६ हेक्टर आंबा क्षेत्राला हवामान बदल, कीड आणि अनिश्चित फुलोरा या समस्यांचा विळखा बसला आहे. यावर मात करण्यासाठी प्रत्येक झाडाचे निरीक्षण करणारी आणि दर ५०० मीटरवर अचूक हवामान देणारी प्रणाली विकसित केली जाणार आहे.यासाठी प्रति हेक्टर ४५ हजार रुपये खर्च अपेक्षित असून, साडेचार कोटींचा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत दिला जाईल. एडीटी’संस्थेच्या संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भातील अहवाल १० दिवसांत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, “आंबा उत्पादक शेतकरी कधीही मदतीसाठी हात पसरत नाही, पण आज परिस्थिती गंभीर आहे. महायुती सरकार बागायतदारांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, पंचनामे झाले नसतील तर त्या क्षेत्राची माहिती तत्काळ द्यावी. राजकारण किंवा आंदोलनापेक्षा संवादातून मार्ग काढूया. माझे दरवाजे शेतकऱ्यांसाठी नेहमी उघडे आहेत.” यावेळी त्यांनी आंबा संशोधन केंद्राच्या ढिसाळ कारभारावरही ताशेरे ओढले.













