पुण्यात बुधवार पेठेत छापा; चार बांगलादेशी महिलांची सुटका, मानवी तस्करीचा पर्दाफाश

नोकरीच्या आमिषाने भारतात आणून वेश्याव्यवसायास भाग पाडल्याचा आरोप
फरासखाना पोलिसांची कारवाई; एक जण अटकेत, एजंटसह इतरांविरोधात गुन्हा

पुण्यातील बुधवार पेठ परिसरात शहर पोलिसांनी छापा टाकून चार बांगलादेशी महिलांची सुटका केली आहे. या महिलांना नोकरीचे आमिष दाखवून पुण्यात आणण्यात आले होते. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्यात येत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली. या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून बांगलादेशातील एजंट आणि स्थानिक मालमत्ता धारक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानवी तस्करीच्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.


पुणे : पुणे शहर पोलिसांनी बुधवार पेठ परिसरातील एका कुंटणखान्यावर बुधवारी रात्री छापा टाकून चार बांगलादेशी महिलांची सुटका केली. या महिलांना नोकरीचे आमिष दाखवून भारतात आणले असल्याचे समोर आले आहे. पुण्यात आणल्यानंतर त्यांना जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून बांगलादेशातील एजंट तसेच बुधवार पेठेतील मालमत्तेची मालकी असलेल्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून मानवी तस्करीचा मोठा रॅकेट असण्याची शक्यता तपासली जात आहे.

झोन-१ चे पोलिस उपायुक्त ऋषिकेश रावले यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. त्यानुसार फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कुंटणखान्यावर छापा टाकला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशातील एका एजंटने या महिलांना भारतात आणून वेश्यागृहात विकले होते. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध पोलिस घेत आहेत.