विविध शासकीय सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम उपजिल्हाधिकारी शारदा पोवार

शिरगावात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ समाधान शिबिर संपन्न

शिरगाव (प्रतिनिधी) :     शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत त्यांच्या नावाने राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे शासनदरबारी प्रलंबित प्रश्न तातडीने व निश्चितपणे मार्गी लागतील, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी शारदा पोवार यांनी केले.

महसूल व वन विभागातर्फे शिरगाव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयाच्या सभागृहात शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.

या शिबिरात नागरिकांना वारस नोंद, पीएम किसान, तुकडेबंदी, प्रलंबित फेरफार, संजय गांधी निराधार योजना आदी विविध सेवा एकत्रितपणे उपलब्ध करून देण्यात आल्या.

देवगड तहसीलदार रमेश पवार यांनी प्रास्ताविकात सांगितले की, महसूल विभागाच्या सेवा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान प्रभावी माध्यम ठरत आहे. तसेच आरोग्य, कृषी व पंचायत समिती आदी विविध विभागांच्या सेवाही या शिबिरात उपलब्ध करून देण्यात आल्या.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिधापत्रिका, ७/१२ व आठ-अ उतारे, फेरफार आदेश, १५५ दुरुस्ती आदेश, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी पत्र, बांधकाम कामगार दाखले, घरपत्रक उतारे, जन्म-मृत्यू नोंद दाखले तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक अधिवास व जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमास संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष मिलिंद साटम, जि.प. सदस्य देवदत्त कदम, पंचायत समिती सदस्या शीतल तावडे, भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, ओंबळ सरपंच अरुण पवार, शिरगाव ग्रामपंचायत प्रशासक समीर शिरगांवकर, माजी सरपंच अमित साटम, मंगेश धोपटे, कुवळे उपसरपंच सुहास राणे, दुय्यम निबंधक दीपक इंगळे, नायब तहसीलदार छाया आखाडे, संतोष खरात, प्राचार्य समीर तारी, ग्रामविकास अधिकारी मंगेश साळसकर, मंडल अधिकारी रेश्मा कडुलकर, तलाठी श्वेतांजली खरात तसेच विविध खात्यांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.