काष्ठशिल्पातील ‘ज्योत’! पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत राजापूरच्या लेकीने लाकडाच्या तुकड्यांत फुंकले प्राण

नरेंद्र मोहिते | राजापूर : आपण अनेक क्षेत्रांतील महिलांच्या यशोगाथा ऐकतो. पण, राजापूर तालुक्यातील ओणी गावातील ज्योती प्रदीप पांचाळ यांनी निवडलेली वाट काहीशी निराळी आणि कठीण आहे. हातात छिन्नी-हातोडा घेऊन, लाकडाच्या ओबडधोबड ओंडक्यांना जिवंत आकार देणाऱ्या ज्योती यांनी ‘शिल्पकला’ केवळ पुरुषांपुरती मर्यादित नाही, हे आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले आहे.
सामान्यतः सुतारकाम किंवा काष्ठशिल्प हे कष्टप्रद काम मानले जाते. मात्र, ज्योती यांनी शालेय जीवनातील चित्रकलेची आवड जपताना कधी काष्ठशिल्पाकडे वळल्या, हे त्यांनाही समजले नाही. घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी आपल्या छंदाला ‘साधने’चे रूप दिले. आज त्यांच्या घरातील कोपरा हा केवळ कोपरा नसून, ती एक ‘शिल्प कार्यशाळा’ बनली आहे.
“शिल्पकला ही उच्च दर्जाची साधना आहे. त्यात स्त्री-पुरुष असा भेदभाव नसून, फक्त कल्पकता आणि मेहनतीला महत्त्व आहे,” असा संदेश ज्योती यांच्या कामातून मिळतो. ओणी सारख्या ग्रामीण भागातून पुढे येत, काष्ठशिल्पात स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या ज्योती पांचाळ या आजच्या पिढीतील मुलींसाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत.
काष्ठशिल्प ही उच्च दर्जाची शिल्पकला मानली जाते. दगड व धातूप्रमाणेच लाकूड हेही शिल्पकलेचे महत्त्वाचे माध्यम आहे. जंगलातील विविध झाडांपासून मिळणाऱ्या लाकडातून असंख्य आकार, भाव आणि कथा साकार होऊ शकतात; मात्र त्यासाठी कलाकाराची पारखी नजर आणि संयम आवश्यक असतो. हीच नजर आणि समर्पण ज्योती पांचाळ यांच्या कलेत ठळकपणे दिसून येते.
सामान्य कुटुंबात वाढलेल्या ज्योती यांना शालेय जीवनापासूनच चित्रकलेची विशेष आवड होती. वडील प्रदीप यांचा पारंपारिक सुतारकाम आणि गणपती मुर्ती कारखाना आहे. आपल्या पिढीजात सुतारकाम आणि गणपती कार्यशाळेत मदतीचा हात देताना हळूहळू तिच्या या आवडीने काष्ठशिल्पाचे रूप घेतले. घरालाच त्यांनी आपली लहानशी शिल्प कार्यशाळा बनवली. सुतारकामाची आवश्यक अवजारे आणून लाकडाच्या प्रत्येक तुकड्याला आकार देण्यास सुरुवात केली. मागील काही वर्षांपासून त्या ही कला निष्ठेने जोपासत असून आज त्यांच्या संग्रहात अनेक देखणी आणि वैशिष्ट्यपूर्ण काष्ठशिल्पे तयार झाली आहेत. दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळत मिळणाऱ्या फावल्या वेळेत त्या आपल्या छंदाला प्रामाणिकपणे वेळ देतात.
एक शिल्प पूर्ण होण्यासाठी कधी आठ दिवस, तर कधी दोन महिनेही लागतात. शिल्पाचा आकार, रचना आणि सूक्ष्म कामावर हा कालावधी अवलंबून असतो. लाकडाला पटाशी, किकरे, काणस यांसारख्या अवजारांनी हळूहळू अपेक्षित आकार दिला जातो. काही शिल्पे अखंड लाकडातून घडवली जातात, तर काहींमध्ये आवश्यकतेनुसार जोडणी केली जाते. पॉलिश पेपरने घासून शिल्प गुळगुळीत केले जाते आणि शेवटी पॉलिशचा लेप दिल्यानंतर ते अधिक उठावदार दिसू लागते. एकदा तयार झालेले शिल्प पुन्हा तंतोतंत तसचे बनत नाही; प्रत्येक शिल्पाचे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आणि वेगळेपण असते, असे ज्योती सांगतात. या कलेसाठी त्या शिवन, जांभूळ, साग, बोर, अंजन आदी लाकडांचा वापर करतात.
ज्योती पांचाळ यांच्या संग्रहात बैलगाडी, लाटणे, बाजवड, गवराई, रोटपाटले पाटल, कामशिल्प अशा विविध आकर्षक काष्ठशिल्पांचा समावेश आहे. “छंदातून जोपासलेल्या माझ्या काष्ठशिल्पांचे जिल्हास्तरावर प्रदर्शन भरवण्याची इच्छा आहे; मात्र आजवर अशी संधी मिळाली नाही, याची थोडी खंत वाटते,” असे त्या सांगतात. शिकण्याची ओढ अजूनही कायम असून, त्यादृष्टीने त्या सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे येथे शिक्षण घेत आहेत. तीने बारावी पर्यंतचे शिक्षण नूतन विद्यामंदिर ओणी येथे झाल्यावर आपल्या पिढीजात व्यवसायाला करिअर म्हणून पुढे नेण्याचा संकल्प केला. सध्या ती सावर्डे येथे शिल्पकलेचा डिप्लोमा करत असून ती शिल्प व प्रतिमानबंध कला या विभागात प्रथम वर्षात शिकत आहे. तर यापुर्वी तीने सावर्डे येथेच एक वर्षाचा शिल्पकलेचा फाऊंडेशन कोर्स पुर्ण केला आहे. मागील शैक्षणिक वर्षात तीच्या दोन कलाकृतींची महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनासाठी निवड झाली होती. तर चालु वर्षीही दोन कलाकृतींची या प्रदर्शनासाठी निवड झाली होती.
काष्ठ हे शिल्पकलेच्या सर्वात प्राचीन माध्यमांपैकी एक आहे. ज्योती पांचाळ यांच्या कलेतून भारतीय कलेच्या ऐतिहासिक प्रवासाची जाणीव होते, असे मत एका कलाशिक्षकाने व्यक्त केले. ग्रामीण भागातून उगवलेली ही काष्ठकला केवळ छंद न राहता, भविष्यात मोठी ओळख निर्माण करेल, अशी आशा कलाप्रेमींना वाटत आहे. या शिल्पकलेसाठी प्राचार्य माणिक यादव व कला शिक्षक रूपेश सुर्वे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.