शिमगोत्सवातील वादातून चाकूने वार; तिघांना ५ दिवसांची पोलीस कोठडी

रत्नागिरी ः प्रतिनिधी
शिमगोत्सवातील किरकोळ वादाचा राग मनात धरुन जयेंद्र दत्ताराम नार्वेकर (55,रा.भाटिमिऱ्या,रत्नागिरी) यांच्यावर चाकूने वार करणाऱ्या तिन संशयितांना शहर पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. वार केल्याची ही घटना शनिवार 7 मार्च रोजी सकाळी 11 वा.सुमारास मिरकरवारडा जेटीच्या पहिल्या गेटजवळ घडली होती.

शशांक सावंत,संजू आणि रुपेश सावंत उर्फ छोटा भाई (तिन्ही रा.सडामिऱ्या,रत्नागिरी) अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. दत्तमंदिर भाटिमिऱ्या येथे रस्त्यावर मंडप आणि रांगोळी काढण्याचे काम सुरु होते. त्यावेळी तीन मुलींच्या दुचाकीचा धक्का त्याठिकाणी मंडपाचे काम करणाऱ्या एकाला लागल्याने वाद झाला होता. हा वाद त्यावेळी मिटवण्यात आला होता. परंतू त्या वादाचा राग मनात धरुनच शनिवारी सकाळी जयेंद्र नार्वेकर यांच्यावर वार करण्यात आले. दरम्यान, शहर पोलिसांनी तिन्ही संशयितांना अटक केली असून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.