देवरूख (प्रतिनिधी)
संगमेश्वर (देवरूख) तहसीलदार कार्यालय व माखजन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान (टप्पा क्र. १) अंतर्गत आंबव पोंक्षे (ता. संगमेश्वर) येथील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरासाठी जिल्हा परिषद सदस्य सुशील भायजे, पंचायत समिती सदस्य महेश जड्यार, पंचायत समिती सदस्या प्रिया सुवरे, नायब तहसीलदार सुदेश गोताड, माखजन मंडळातील विविध गावांचे सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील तसेच शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरादरम्यान शासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देत मार्गदर्शन केले. महसूल, भूमि अभिलेख, कृषी, वन, आरोग्य, ग्रामविकास, आयसीडीएस, परिवहन तसेच महा-ई सेवा केंद्र अशा विभागांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. नागरिकांनी या स्टॉल्सना भेट देऊन विविध योजनांची माहिती घेतली.
यावेळी संजय गांधी विभागाच्या लाभार्थ्यांना मंजुरी आदेश, जीवंत ७/१२ मोहिमेतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे, तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहारातील शेरा कमी केलेली प्रकरणे, भो.व.२ चे भो.व.१ मध्ये रूपांतर, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८अ उतारे तसेच उत्पन्न दाखले यांचे वितरण करण्यात आले.
शासनाच्या या उपक्रमाबद्दल उपस्थित पदाधिकारी व नागरिकांनी समाधान व्यक्त करत उत्कृष्ट नियोजनाबद्दल माखजन मंडळ अधिकारी सागर करंबेळे तसेच मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माखजन मंडळ अधिकारी सागर करंबेळे यांनी केले, तर सूत्रसंचालन रवींद्र घाणेकर यांनी केले.











