वेंगुर्ला : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त केंद्रशाळा वायंगणी सुरंगपाणी येथे माता-पालकांसाठी “तांदूळा पासून विविध पदार्थ बनवणे” या थीमवर पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत माता-पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत तांदळापासून तयार केलेले विविध चविष्ट व पौष्टिक पदार्थ सादर केले. सरस्वती मातेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली .स्पर्धेतील पदार्थांचे मूल्यमापन श्रीमती नेत्रांकिता तांडेल यांनी चव, सादरीकरण, स्वच्छता व पौष्टिकता या निकषांवर केले. या स्पर्धेत सौ. दिप्ती दिपक राजापूरकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सौ. सानिका सोमकांत कावले यांनी द्वितीय क्रमांक तर सौ. मालिनी महेश टेमकर यांनी तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले.
विजेत्या स्पर्धकांना भेटवस्तू व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सायली धुरी, ममता टेमकर, संचिता पेडणेकर, संगीता कोळेकर व शकुंतला चौहान यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेतील बक्षिसे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम शामल मांजरेकर यांनी पुरस्कृत करून स्पर्धकांचे कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद व पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले.












