आवळेगाव हायस्कूलमध्ये ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा

कुडाळ :
आवळेगाव हायस्कूल व कला-वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालय, आवळेगाव येथे सोमवार दिनांक ९ मार्च २०२६ रोजी ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आवळेगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा श्रीम. मानसी सावंत या होत्या, तर प्रमुख पाहुण्या म्हणून आवळेगाव व ओरोस खुर्द ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका श्रीम. अनुभवी पवार उपस्थित होत्या.

कार्यक्रमाला सरपंच श्रीम. पूर्वा सावंत, सेवानीवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापिका श्रीम. रश्मी सावंत, श्रीम. मानसी चव्हाण व श्रीम. कांचन देसाई यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत मधुर आवाजात सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीम. मानसी कुंभार मॅडम यांनी केले. त्यांनी इसवी सन १९०८ पासून सुरू झालेल्या महिला हक्क चळवळीचा इतिहास आणि आजपर्यंतचा प्रवास उपस्थितांसमोर उलगडून सांगितला. यानंतर इयत्ता आठवी व नववीतील विद्यार्थिनींनी आपल्या भाषणांतून इतिहासातील अजरामर महिलांच्या कार्याचा आढावा घेतला.

प्रमुख पाहुण्या श्रीम. अनुभवी पवार यांनी विद्यार्थिनींनी महान महिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षणाची वाटचाल दृढपणे सुरू ठेवावी, असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात श्रीम. मानसी सावंत यांनी मुलांनी आपल्या आई-बहिणींच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून समाजातील सर्व महिलांप्रती आदर व सन्मानाची भावना ठेवावी, तसेच महिलांना भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन केले.

यावेळी श्रीम. पूर्वा सावंत, श्रीम. रश्मी सावंत व श्रीम. कांचन देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जी. बी. कांबळे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीम. रत्नाताई कालकुंद्रीकर मॅडम यांनी केले.