मुणगे येथील कुटुंबाची वाळीत टाकल्याची तक्रार

देवगड / प्रतिनिधी
मुणगे बांबरवाडी येथील आनंद रामचंद्र कदम यांनी वाडीतील काही ग्रामस्थांनी आपल्याला व आपल्या कुटुंबाला ११ मे २०२४ पासून वाळीत टाकल्याची तक्रार देवगड पोलीस स्थानकात केली आहे. संबंधित ग्रामस्थांनी मला व माझ्या कुटुंबावर सामाजिक, सार्वजनिक कामामध्ये तसेच शुभकार्यामध्ये बहिष्कार टाकला आहे. तसेच काही ना काही कारणावरून माझ्या कुटुंबियांचा मानसिक छळ सुरू असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच संबंधित ग – ामस्थांची नावे त्यांनी तक्रारीत नमूद करून न्यायाची मागणी केली आहे. या तक्रारीची प्रत त्यांनी देवगड तहसीलदारांना दिली आहे.
श्री. कदम यांनी तक्रारीत म्हटले आहे, माझ्या कुटुंबात माझे वडील, पत्नी व माझी मुले असा परिवार असून जन्मतःच मी या गावात राहतो. वाडीतील काही ग्रामस्थांनी ११ मे २०२४ रोजी माझ्याविरोधात वाडीची बैठक घेऊन त्याच दिवसापासून मला व माझ्या कुटुंबाला वाळीत टाकले आहे. या प्रकाराचा मानसिक त्रास झाल्याने ८ ऑक्टोबर २०२४ रोजी माझी आई सौ. लिना रामचंद्र कदम यांचे निधन झाले. वाडीतील सदर कुणीही ग्रामस्थ आईच्या अंत्ययात्रेला उपस्थित राहिले नाहीत. तसेच ७ मार्च २०२६ रोजी माझ्या वैयक्तिक पाण्याच्या पंपाला जोडलेली वायर अचानक तोडली. त्यामुळे माझ्या घरी येणारे पाणी बंद झाले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून मी व माझे कुटुंब गर्भगळीत झालो आहोत. या विषयाबाबत योग्य ती चौकशी करून व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून मला न्याय द्यावा, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.