वेंगुर्ला । प्रतिनिधी : होडावडे देऊळवाडी येथील उत्साही आणि मनमिळावू युवक तथा फेब्रिकेशन व्यावसायिक सखाराम ऊर्फ पप्पू विलास जबडे (वय ३७) यांचे सोमवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकाली निधन झाले. त्यांच्या या आकस्मिक जाण्याने संपूर्ण होडावडे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
सखाराम जबडे हे आपल्या शांत आणि संयमी स्वभावामुळे सर्वांचे लाडके होते. गावातील कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा. ‘सप्तरंग कलामंच’ या संस्थेच्या माध्यमातून तसेच अन्य विविध संस्थांमधून त्यांनी गेली अनेक वर्षे सांस्कृतिक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली होती. त्यांच्या निधनामुळे एका कलाप्रेमी आणि कार्यक्षम युवकाला समाज मुकला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, विवाहित बहीण आणि काका असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिक, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली. एका उमद्या आणि कर्तृत्ववान युवकाच्या जाण्याने गावाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून उमटत आहे.












