21 व 22 मार्च रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आणि नामवंत कलाकारांची उपस्थिती
दापोली | प्रतिनिधी :
गतवर्षीप्रमाणे यंदाही दापोली येथे दि. 21 व 22 मार्च 2026 (शनिवार-रविवार) रोजी दापोली सांस्कृतिक महोत्सवाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे. कोळथरे येथील सुप्रसिद्ध कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठान यांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे मुख्य प्रायोजकत्व लाभले आहे.
या महोत्सवाच्या माध्यमातून दापोली परिसरासह संपूर्ण कोकणातील संस्कृती, लोककला आणि विविध कलाप्रकार सादर करणाऱ्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. त्यामुळे स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे.
दि. 21 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजता महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेते देवदत्त नागे, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार आशिष शेलार, गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम तसेच विधान परिषद आमदार उमाताई खापरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याच दिवशी दापोलीच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे दर्शन घडविणारे काटखेल-जाखडी यांचे सादरीकरणही होणार आहे. उद्घाटनानंतर दापोलीतील नामांकित कलाकारांच्या सहभागातून ‘भक्तीरंग’ या संकल्पनेवर आधारित विशेष कार्यक्रम सादर होणार असून नृत्य, नाट्य, संगीत, वादन, चित्रकला व गायन यांचा सुंदर संगम रसिकांना अनुभवता येणार आहे. तसेच अभिनेते देवदत्त नागे हेही प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत.
दि. 22 मार्च रोजी दिवसभर चित्रकला व रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच दिवशी सायंकाळी ‘सूर तेच छेडिता’ हा सुरेल कार्यक्रम रंगणार असून सुप्रसिद्ध गायिका मधुरा कुंभार, गायक ऋषिकेश रानडे, सुप्रसिद्ध ढोलकीवादक निलेश परब तसेच आर्चिस लेले व कमलेश भडकमकर यांच्या संचाचा कार्यक्रम होणार आहे.
महोत्सवादरम्यान विविध कला स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा एकल (Individual) व सामूहिक (Group) अशा दोन प्रकारांत होणार आहेत. दि. 20 मार्च रोजी दुपारी एकल गटातील चित्रकला, रांगोळी, फोटोग्राफी आणि रिल्स स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तर 21 व 22 मार्च रोजी सामूहिक गटातील खालूबाजा, कोकणातील लोककला (काटखेल, जाखडी, कोळी नृत्य आदी), नाट्यछटा व भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
सामूहिक स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 10,000 रुपये व चषक, द्वितीय 7,000 रुपये व चषक आणि तृतीय 5,000 रुपये व चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तर एकल स्पर्धांमध्ये प्रथम 3,000 रुपये व चषक, द्वितीय 2,000 रुपये व चषक आणि तृतीय 1,500 रुपये व चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
आपल्या परिसरातील कलाकारांना व कलांना व्यासपीठ मिळावे व त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्पर्धा संयोजक प्रीती वैद्य यांनी दिली. तसेच या सर्व स्पर्धांमध्ये कलाकार, सांस्कृतिक मंडळे, भजनी मंडळे तसेच महिला व युवा मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महोत्सवाचे संयोजक मिहीर महाजन यांनी केले आहे.
या महोत्सवाच्या व विविध स्पर्धांच्या आयोजनामध्ये ‘युवा प्रेरणा कट्टा’ टीमचा विशेष सहभाग आहे.












