आंबेनळी अपघात : ‘दाभिळटोंक’ ठरतेय मृत्यूचे ‘टकमकटोक’

स्कॉर्पिओ दरीत कोसळून पेटली? सातारा जिल्हयातील 8 तरूण ठार
आंबेनळी घाटामधील जीवघेण्या अपघाताचा 17 तासानंतर सुगावा; 27 तासांनी ‘रेस्क्यू’ला सुरूवात

पोलादपूर (शैलेश पालकर)- झीटिव्हीचे संचालक झैदी यांची कार कोसळलेल्या ‘दाभिळटोंक’ येथे डॉ.बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाची बस कोसळली आणि आता त्याच ठिकाणी स्कॉर्पिओ गाडी कोसळली. स्कॉर्पिओ आणि कृषी विद्यापिठाच्या बस कोसळण्यामागे दोन्ही वाहने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथून आल्याचा अनोखा योगायोग दिसून येत आहे.

रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील ‘दाभिळटोंक’ येथील दरीत सुमारे 1200 ते 1500 फूट खोल दरीत कोसळून स्कॉर्पिओने पेट घेतला असण्याची शक्यता व्यक्त होत असून काळया रंगाची स्कॉर्पिओ साधारणपणे 80 टक्केहून अधिक पेट घेतल्यासारखी तांबडा रंगाचा पत्रा झालेली दरीतून प्राप्त ड्रोनफोटोंमध्ये दिसून आली. रविवारी रात्री साधारणपणे 10 वाजण्याच्या सुमारास या अपघाताचा सुगावा मोबाईल बंद झाल्याने लोकेशन द्वारे लागला. रात्रीच्या काळोखामुळे खोल दरीत उतरण्याचे धाडस आत्मघातकी असल्याने टाळण्यात आले आणि सोमवारी सकाळी 8 वाजता रेस्क्यूची सुरूवात झाल्याची माहिती प्राप्त झाली. सातारा जिल्हयातील 8 तरूण ठार झाल्याची माहिती अधिकृतपणे पोलादपूरचे सहायक पोलीस निरिक्षक आनंद रावडे यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिली.

‘दाभिळटोंक’ ठरतेय मृत्यूचे ‘टकमकटोक’

पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील ‘दाभिळटोंक’ अनेकदा मृत्यूचे ‘टकमकटोक’ ठरले असल्याचे आजपर्यंतच्या अपघाताच्या घटनांमुळे अधोरेखित झाले आहे. पहिल्यांदा ‘दाभिळटोंक’ येथे झीटिव्हीचे संचालक झैदी यांची कार कोसळून झालेल्या अपघात संपूर्ण झैदी कुटूंब ठार झाले होते. यानंतर ‘दाभिळटोंक’ येथे डॉ.बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाची बस कोसळून एक व्यक्ती वगळता संपूर्ण बसमधील 30 प्रवासी कर्मचारी ठार झाले होते.

रविवारी पहाटे सातारा जिल्ह्यातील 8 तरूण दापोलीतील करदे समुद्रकिनाऱ्यावरून मौजमजा करून पुन्हा आपआपल्या गावाकडे परतत असताना रविवारी पहाटेपासून गाडीतील एकाही तरुणासोबत मोबाईलद्वारे संपर्क होत नसल्याने नातेवाईकांनी सातारा पोलीसांकडे संपर्क साधला आणि शेवटचे लोकेशन आंबेनळी घाटातील मृत्यूचे थैमान घालणाऱ्या ‘दाभिळटोंक’ येथे आढळून आल्यानंतर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला असल्याचा सुगावा दरीच्या दिशेचे क्रॅश बॅरियर्स एका ठिकाणी तुटल्याचे तसेच एका धक्क्यावर टायरमार्क्स दिसून आल्याने लागला. याठिकाणी पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक आनंद रावडे आणि तहसिलदार कपिल घोरपडे तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित झाले. मात्र, काळोख्या रात्री मृत्यूच्या खाईत कोसळलेल्या स्कॉर्पिओ गाडीचा तसेच गाडीतील व्यक्तींचा आणि जखमी तसेच मृतदेहांचा शोध घेणे केवळ अशक्य असल्याचे जाणवल्याने सोमवारी सकाळी सूर्योदय होण्याची वाट पाहण्याचा एकमेव पर्याय असल्याने अंधाऱ्या दरीत प्रकाश पडण्याची प्रतिक्षा प्रशासन आणि रेस्क्यू टिमच्या सदस्यांना होती.

रेस्क्यू टिमची उपस्थिती सोमवारी पहाटेपासून रेस्क्यू सुरू

पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील ‘दाभिळटोंक’ येथील अपघातस्थळी पोलादपूर पोलीस, महामार्ग वाहतूक पोलीस, पोलादपूर तहसीलदार व कर्मचारी, प्रतापगड सर्च ऍंड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रॅकर्स आणि सी-स्केप-महाडचे रेस्क्यू टिमचे जवान जीवाची पर्वा न करता दोरखंडाच्या साहाय्याने दरीत उतरण्याची तयारी करून सूर्योदयासोबतच दोरी दरीत सोडून सोमवारी पहाटेपासून रेस्क्यू वर्क सुरू केले. दरी खूपच खोल असल्याने प्रशासनाने ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने खोल दरीत काळया रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीचा शोध लावला. ही गाडी टप्पे खात आदळत आपटत खोल दरीत स्थिरावताना गाडीचा काळा रंग असूनही अनेक ठिकाणी जळल्यासारखा तांबडा पत्रा दिसून आल्याने दरीत कोसळल्यानंतर गाडीने पेट घेतल्याची शक्यता व्यक्त होत आहे. दोरीच्या साह्याने रेस्क्यू टिमचे सदस्य दरीमध्ये उतरण्यास सुरूवात झाल्यानंतर त्यांना काळया रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीचे अवशेष ठिकठिकाणी दिसून आले. यावेळी जेथे जेथे स्कॉर्पिओ गाडी आदळत दरीमध्ये गेली; त्या-त्या ठिकाणी एकेका व्यक्तीचे प्रेतही आढळून आले. यावेळी स्कॉर्पिओ गाडीतील तरूणांची संख्या आणि ‘दाभिळटोंक’ येथील दरीतील मृतदेहांची संख्या 8 असल्याचे आढळून आल्याने मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी रूग्णवाहिका आणि अन्य शासकीय वाहनांसह रेस्क्यूटिमचे प्रमुख सागर दहिर्वेकर यांनीही अपघातस्थळी पोहोचून रेस्क्यू टिमच्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यास सुरूवात केल्याने पहिला मृतदेह केवळ तासाभरातच दरीबाहेर काढण्यात रेस्क्यू टिमला यश आले.

चालकाचे नियंत्रण सुटल्यानेच स्कॉर्पिओ गाडी दरीमध्ये

पोलादपूर तालुक्यातील ‘दाभिळटोंक’ येथील अपघातप्रवण क्षेत्र दरीच्या बाजूने तकलादू स्वरूपाच्या क्रॅश बॅरियर्सचा वापर करून जणू तयार करण्यात आले आहे असे सकृतदर्शनी दिसून येत असून तीव्र वळणानंतर सरळ घाटरस्ता आणि पुन्हा वळण यामुळे कोणत्याही वाहनाचा वळल्यानंतर दरीच्या बाजूला झोक जाऊन वाहन दरीत कलंडण्याची अथवा नियंत्रण सुटून थेट तकलादू क्रॅश बॅरियर्सला धडकून दरीत झेपावण्याची शक्यता निर्माण होते. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटकडून याठिकाणी डोंगराचे कातळ फोडून रस्ता रूंदीकरण करण्यासोबत अपघातप्रवण क्षेत्राची तीव्रता कमी करण्याची आवश्यकता आहे. परंतू, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग जसा रस्त्याचे रूंदीकरण पूर्वीची वळणे आणि उतार कायम ठेऊन चौपदरीकरण झाले तसाच आंबेनळी घाटातील रस्त्यादेखील तीव्र वळणे आणि तीव्र उतार कायम ठेऊन ठेकेदारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, स्कॉपिओ (क्र.एमएच 11 डीएम2340)चा ड्रायव्हर संदीप काटकर (वय 35, रा. आझादपूर, ता. कोरेगाव, जि.सातारा) यालादेखील या अपघातप्रवण क्षेत्राचा अंदाज न आल्याने प्रथम तीव्र वळण आहे या सूचना फलकाजवळील धक्क्यावर गाडी चढून त्यानंतर काही अंतरावरील संरक्षक कठडयाला धडकून 1200 ते 1500 फूट दरीत कासळल्याचे दिसून आले.

सर्व मृत तरूण 18 ते 35 वयोगटातील;आसगाव, मरडे आणि आझादपूर दु:खात

आंबेनळी घाटातील कोसळलेल्या स्कॉर्पिओ ‘एन’ या वाहनाचा ड्रायव्हर संदीप काटकर या 35 वर्षे वयाचा आझादपूर येथील रहिवासी होता तर आसगावचा अंश समीर चव्हाण हा सर्वात तरूण 18 वर्षांचा होता. याव्यतिरिक्त महेश अनिल पवार (वय 25), आदित्य अशोक साळुंखे (वय 21), रितेश राजेंद्र लोखंडे (वय25), सुहास जितेंद्र लोखंडे (वय 20) हे चौघे तरूणदेखील आसगाव येथील रहिवासी होते. उत्कर्ष आनंदा शिंगटे (वय 21) आणि निखिल अभिमन्यू शिंगटे (वय 25) हे दोघे मरडे गावातील रहिवासी होते. यामुळे अपघात पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटात झाल्याच्या वृत्ताने जेवढी हळहळ कोकणात व्यक्त झाली त्यापेक्षाही अधिक दु:ख सातारा जिल्हयातील आसगाव, मरडे आणि आझादपूर या तिन्ही गावांमध्ये व्यक्त झाले.

पोलादपूर पोलीसांची अपघातस्थळी अन् ग्रामीण रूग्णालयात छावणीसदृश्य स्थिती

पोलादपूर तालुक्यातील ‘दाभिळटोंक’ येथील आंबेनळी घाटातील अपघातप्रवण क्षेत्रातून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांची दाटी वाढून बघ्यांची गर्दी वाढू नये यासाठी पोलादपूर पोलीसांची अपघातस्थळी अन् तरूणांचे मृतदेह पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी वाढू नये यासाठी ग्रामीण रूग्णालयात छावणीसदृश्य स्थिती दिसून आली. अपघातस्थळी वाहतूक नियंत्रणासह रेस्क्यूवर्क तसेच रेस्क्यूटिम सदस्यांना सहकार्य करणाऱ्या पोलादपूर पोलीसांनी सहायक पोलीस निरिक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवल्याचे तसेच उपनिरिक्षक सतीश पवार यांच मार्गदर्शनाखाली ग्रामीण रूग्णालयामध्ये मृतांच्या नातेवाईकांना तसेच प्रेताच्या उत्तरीय तपासणीकामी डॉक्टरांना तातडीने सहकार्य करण्याची भूमिका बजावण्यात आली. सोमवारी दुपारनंतर सर्व रेस्क्यूटीमचे सदस्य, पोलादपूर पोलीस, प्रशासन तसेच रूग्णवाहिका कर्मचारी यांनी सर्व 8 जणांचे मृतदेह दरीतून बाहेर काढून ग्रामीण रूग्णालयामध्ये शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले.