सन २०२६–२७ या आर्थिक वर्ष : अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची नविन करवाढ नसल्याने लांजावासीयांना दिलासा
लांजा -: संतोष कोत्रे
लांजा नगरपंचायतीचा ३० कोटी ९ लाख १६ हजार ८३८ रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे. सन २०२६–२७ या आर्थिक वर्षासाठी असलेल्या या आराखड्यात कोणतीही नवीन करवाढ केलेली नसल्याने नागरिकांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.
लांजा नगरपंचायतीची सभा नुकतीच नगराध्यक्षा सावली सुनील कुरूप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या सभेत आर्थिक वर्ष २०२६–२७ साठीचा तब्बल ३० कोटी ९ लाख १६ हजार ८३८ रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. असून शहराच्या विकासाला गती देणारा आणि मूलभूत सुविधांवर भर देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे सांगण्यात आले.
लांजा नगरपंचायतीच्या अर्थसंकल्प अंदाजपत्रक मंजुरीच्या बैठकीस नगराध्यक्षा सावली कुरूप यांच्यासह नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर, मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, सर्व नगरसेवक, नगरपंचायतीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध योजनांवर भर देण्यात आला.
नगरपंचायतीत मंजूर अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना, दलितेत्तर वस्ती विकास योजना, तसेच शहरातील रस्ते दुरुस्ती व बांधकाम, पाणीपुरवठा व्यवस्था मजबूत करणे, गटारे बांधकाम व स्वच्छता व्यवस्थेचे सुधारणा कामे यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर नगरपंचायतीने विशेष भर दिल्याचे दिसून येते.
अर्थसंकल्पातून शहरातील नागरिकांच्या दैनंदिन गरजांना केंद्रस्थानी ठेवून विकासकामांना प्राधान्य दिल्याचे सांगण्यात आले. तसेच महसुली व भांडवली खर्चाचे सुयोग्य नियोजन करत नागरिकांना मूलभूत सेवासुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध करून देण्याचा आराखडा मांडण्यात आला असून येणाऱ्या आर्थिक वर्षात शहराच्या विकासाला गती देण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची करवाढ करण्यात आलेली नाही, त्यामुळे लांजावासीयांना दिलासा मिळाला आहे. एकूणच विकासकामांना गती देतानाच नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये याची देखील काळजी नगरपंचायतीने घेतली आहे. तर या अर्थसंकल्पामुळे लांजा शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होऊन विविध विकासकामांना चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.











