गोविंदराव निकम इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी, सावर्डे येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात
चिपळूण (प्रतिनिधी) : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक महत्त्वपूर्ण भर पडली असून संस्थेच्या गोविंदराव निकम इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी, सावर्डे (ता. चिपळूण) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून बॅचलर ऑफ फिजिओथेरपी (B.P.Th.) हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमास महाराष्ट्र शासनाची मान्यता असून महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (MUHS) यांच्याशी संलग्न आहे. त्यामुळे कोकणातील फिजिओथेरपी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आगवे येथेच दर्जेदार व्यावसायिक शिक्षणाची नवीन संधी उपलब्ध झाली आहे.
फिजिओथेरपी हे आधुनिक आरोग्यसेवेतील अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र असून दुखापती, हाडे व सांधे, स्नायू, मज्जासंस्था, हालचालींशी संबंधित समस्या तसेच शस्त्रक्रियेनंतरची पुनर्वसन प्रक्रिया यामध्ये फिजिओथेरपिस्टची भूमिका महत्त्वाची असते. वाढत्या आरोग्यविषयक गरजा आणि पुनर्वसन सेवांची वाढती आवश्यकता लक्षात घेता या क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळाची मागणीही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सह्याद्री शिक्षण संस्थेने आगवे येथे फिजिओथेरपी पदवी अभ्यासक्रम सुरू केल्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तसेच चिपळूण आणि परिसरातील विद्यार्थ्यांना आरोग्य क्षेत्रातील पदवी शिक्षणाची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाली आहे. B.P.Th. (Bachelor in Physiotherapy) हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून प्रवेश प्रक्रिया NEET-UGच्या माध्यमातून केली जाणार आहे.
प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (PCB) या विषयांसह उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. PCB विषयांमध्ये किमान ५० टक्के एकत्रित गुण, इंग्रजी हा अनिवार्य विषय, NEET-UG पात्रता तसेच वैद्यकीय तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे संस्थेने जाहीर केले आहे. गोविंदराव निकम इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपीमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या गरजेनुसार अनुभवी व पात्र प्राध्यापकवर्ग, आधुनिक पायाभूत सुविधा आणि सुसज्ज प्रयोगशाळांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक प्रशिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष प्रशिक्षणावरही भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार शिष्यवृत्तीच्या संधी तसेच वसतिगृहाची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना फिजिओथेरपीसारख्या आरोग्यविषयक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुकूल वातावरण मिळणार आहे. सह्याद्री शिक्षण संस्था गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना विविध शाखांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे. शिक्षणासोबतच आरोग्य क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून स्थानिक विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख आणि व्यावसायिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या संस्थेच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. फिजिओथेरपी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आरोग्यसेवा क्षेत्रात आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्ये आणि व्यावसायिक प्रशिक्षण मिळणार असून भविष्यात रुग्णालये, पुनर्वसन केंद्रे, फिजिओथेरपी क्लिनिक, क्रीडा क्षेत्र, आरोग्य व पुनर्वसन सेवा आदी विविध क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. या अभ्यासक्रमासाठी कॉलेज चॉईस कोड ०६४२२ असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
फिजिओथेरपी क्षेत्रात पदवी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी NEET-UG प्रवेश प्रक्रियेत आवश्यक ती कार्यवाही करून गोविंदराव निकम इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी, आगवे येथे प्रवेशाबाबत माहिती घ्यावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. प्रवेश व अधिक माहितीसाठी महेश महाडिक (७५०७६४२६५५), हरिश्चंद्र सुर्वे (९४२००५२९४६) आणि रुपेश गोसावी (९८६७३३२३९०) या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. ई-मेलद्वारे माहितीसाठी [email protected] येथे संपर्क करता येईल.
गोविंदराव निकम इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी, सावर्डे येथे सुरू झालेल्या या नवीन अभ्यासक्रमामुळे कोकणातील विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातच फिजिओथेरपी विषयातील पदवी शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली असून आरोग्यसेवा क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी ही नवीन शैक्षणिक संधी ठरणार आहे.












