रत्नागिरी: गुहागर पोलीस ठाणे हद्दीतील शृंगारतळी बाजारपेठेत झालेल्या घरफोडीच्या प्रयत्नाचा छडा लावण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. या प्रकरणी मुंबईतील घाटकोपर आणि कुर्ला भागातून चार संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून सुमारे ₹११.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे १:३१ वाजण्याच्या सुमारास शृंगारतळी बाजारपेठेतील ‘ओंकार ज्वेलर्स’ या दुकानात चोरीचा प्रयत्न झाला होता. अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या बाहेरील शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला आणि आतील शटर तोडण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेबाबत गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (६), ३३१ (४) आणि ६२ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ११/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला होता. पथकाने तांत्रिक तपास, सी.सी.टी.व्ही. फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे मुंबईतून खालील चार आरोपींना ताब्यात घेतले:
• निशांत सुधीर आंबोकर (रा. पंतनगर, घाटकोपर)
• मोईन शकील शेख (रा. घाटकोपर)
• सुमित कुलदीप चुनियाना (रा. कोहीनूर सिटी, कुर्ला)
• आयुष जितेंद्र घागडा (रा. तानसा पाईपलाईन, घाटकोपर)
मुद्देमाल जप्त
पोलीस कारवाईदरम्यान आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली एक चारचाकी वाहन आणि इतर साहित्य असा एकूण ₹११,९५,२००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तपास पथक
ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, पोलीस हवालदार विजय आंबेकर, गणेश सावंत, दिपराज पाटील, योगेश नार्वेकर आणि चालक पोलीस शिपाई अतुल कांबळे यांचा समावेश होता.
या प्रकरणाचा पुढील तपास गुहागर पोलीस ठाणे करीत आहे.












