नगरपंचायत क्षेत्रातील पाणीपट्टी माफ करा: सचिन जाधव

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना सिंधुदुर्ग च्या वतीने नुकतीच जिल्हा परिषद सिंधुदुर्ग चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री जयप्रकाश परब यांची सदिच्छा भेट घेण्यात आली.

या वेळी देवगड नगरपंचायत क्षेत्रातील शाळांची सुमारे 3लाख 32 हजार रुपये थकीत पाणीपट्टी माफ होऊन नगरपंचायत क्षेत्रातील शाळांना मोफत पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी करण्यात आली. थकीत पाणी बिलांच्या संदर्भात यापूर्वीही संघटनेने पाठपुरावा केल्याचे जिल्हाध्यक्ष सचिन जाधव यांनी माहिती देताना सांगितले. देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांचे पत्र यापूर्वीच नगरपंचायत तसेच पंचायत समिती देवगड येथे दिल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही.

तसेच यावर्षी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग कडून शाळांच्या वीज बिलाबाबत अनुदान मंजूर न झाल्याने विज बिल भरण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनाने शाळांना पुढील वर्षासाठी ग्रामपंचायत आराखड्यात वीज बिलासाठी अनुदान मागणी करावी अशा सूचना केलेल्या आहेत.मात्र नगरपंचायत क्षेत्रातील शाळांच्या वीज बिलांसाठी नगरपंचायत आराखड्यामध्ये अनुदान मागणीसाठी योग्य ते मार्गदर्शन व कार्यवाही व्हावी अशी मागणी संघटनेने केली आहे.

नगरपंचायत क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांचे विविध प्रशासकीय विषय हे प्रलंबित राहतात याकडे संघटनेने लक्ष वेधले आहे.

जिल्हा परिषद आयोजित कला क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात बऱ्याच उशीर झालेला आहे, मार्च एप्रिल महिन्यात हा महोत्सव आयोजित करण्याचे ठरल्यास तीव्र उन्हाळा पाहता मैदानी खेळ घेण्यात येऊ नयेत अशी मागणी संघटनेने केली आहे.

त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये सुमारे 45 शिक्षक हे पवित्र पोर्टल भरती मधून शिक्षण सेवक पदावर कार्यरत आहेत. त्यांना नवीन शासन आदेशानुसार पेसा क्षेत्रात त्याच पदावर जाण्याचे मार्ग मोकळे झाले आहेत याचा विचार विचार करून अशा शिक्षकांना पेसा क्षेत्रात जाण्याची परवानगी जिल्हा परिषदेने देणे अपेक्षित आहे जेणेकरून अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना थोडासा दिलासा मिळेल.

अशा विविध प्रकारच्या महत्त्वाच्या प्रश्नांच्या बाबत संघटनेने ही भेट घेतली. मान.उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रश्नाबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करून पुन्हा एकदा संघटनेला सभेसाठी निमंत्रित करू असे आश्वासन संघटनेला दिले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन जाधव यांच्यासह जिल्हा सचिव अमित ठाकूर हे उपस्थित होते.