‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी’आयोजित ‘लोक-सिंधू महोत्सवा’चा दिमाखदार प्रारंभ

​सावंतवाडी | प्रतिनिधी :
‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी’च्या वतीने आयोजित बहुचर्चित ‘लोक-सिंधू महोत्सव २०२६’ चा उद्घाटन सोहळा मळगांव येथे अत्यंत उत्साही आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. या महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले असून, पहिल्याच दिवशी नागरिकांनी या सांस्कृतिक मेजवानीला मोठी गर्दी केली होती.

​ ​कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. याप्रसंगी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर, ‘लोकमान्य’चे संचालक गजानन धामणेकर, पंढरी परब, डॉ. दामोदर वागळे, सई ठाकूर बिजलानी आणि ‘तरुण भारत’चे संपादक शेखर सामंत यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

​कार्यक्रमाच्या सुरुवातीला संचालक पंढरी परब यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी लोक-सिंधू महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका मांडताना सांगितले की, “समाजातील सांस्कृतिक मूल्ये जपणे आणि स्थानिक कलाकारांना संधी देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.” यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला.

कलाकारांना मोठे व्यासपीठ
​आपल्या भाषणात सई ठाकूर बिजलानी यांनी महोत्सवाच्या नियोजनाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “अशा उपक्रमांमुळे कोकणातील कला आणि संस्कृतीला नवी झळाळी मिळते. विविध स्पर्धा आणि प्रदर्शनांच्या माध्यमातून स्थानिक प्रतिभेला वाव देणे ही कौतुकास्पद बाब आहे.” उपस्थित अन्य मान्यवरांनीही लोकमान्य सोसायटीच्या बँकिंग क्षेत्रातील प्रगतीसोबतच त्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा गौरव केला.

​नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
​संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन लोकमान्यच्या संचालकांनी केले. या उद्घाटन सोहळ्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. सावंतवाडी आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली