न्यायासाठी शेतकऱ्याचे आजगाव तलाठी कार्यालयासमोर उपोषण
सावंतवाडी । प्रतिनिधी :
आपल्या वडिलांना जिवंत असताना मयत दाखवून चुकीच्या पद्धतीने वारस तपास केल्याच्या निषेधार्थ, आजगाव भोम येथील प्रकाश भिकाजी मालजी यांनी शुक्रवार सकाळपासून आजगाव तलाठी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. गेली १५-१६ वर्षे या अन्यायाविरुद्ध लढा देऊनही न्याय मिळत नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
प्रकाश मालजी यांचे वडील भिकाजी पांडुरंग मालजी हे हयात असताना, त्यांना १३ एप्रिल १९६० रोजी मयत दाखवून वारस तपास करण्यात आला. हा वारस तपास पूर्णपणे चुकीचा असून त्या कागदपत्रांची सत्यप्रत मिळावी, अशी मालजी यांची मागणी आहे. तसेच २००९ सालापासून झालेले तीन वारस तपास, त्यावेळचे मृत्यूचे दाखले, पोलीस पाटील व सरपंच यांचे दाखले आणि पंचांची नावे प्रशासनाने उपलब्ध करून द्यावीत, अशी त्यांची मागणी आहे.
मालजी यांनी निवेदनात म्हटले आहे की, जर संबंधित कागदपत्रे देता येत नसतील, तर बेकायदेशीरपणे लावलेले सातबारावरील नाव तात्काळ काढून सातबारा मोकळा करावा. स्वयंकुळाच्या आदेशाप्रमाणे पुढील पूर्तता करण्याचे आदेश असूनही मंडल अधिकारी यावर कार्यवाही करत नाहीत. या दिरंगाईला जबाबदार कोण, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार प्रकाश मालजी यांनी व्यक्त केला आहे.













