व्यापारी संघाच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
राजापूर (प्रतिनिधी): राजापूर शहराची भौगोलिक रचना, व्यवसायाची एकूणच मंदीची परिस्थिती याचा विचार करता शहरात छप्परपट्टी भरून छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना दैनंदिन छप्परपट्टी भरणे शक्य होणार नाही, त्यामुळे याबाबत प्रशासनाने सुवर्णमध्ये काढून हा वाढीव दैनंदिन छप्परपट्टी आकारणीच्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी करत याबाबतचे एक याबाबतचे एक लेखी निवेदन सोमवारी राजापूर तालुका व्यापारी संघाच्या वतीने मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांना देण्यात आले.
यावर व्यापारी संघासह छप्परपट्टी व खोकेधारकांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून यावर निश्चितच मार्ग काढला जाईल अशी ग्वाही यावेळी मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी सर्व व्यापाऱ्यांना दिली.
राजापूर नगर परिषद क वर्ग नगर परिषद असून उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादीत आहेत. यामुळे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासनाकडून आता सर्व छप्परपट्टी धारकांकडून दैनंदिन करवसुली करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून तशी नोटीस सर्व छप्परपट्टी धारक छोटे मोठे व्यापारी यांना देण्यात आली आहे. मात्र अशा प्रकारे दैनंदिन छप्परपट्टी वाढीला व्यापाऱ्यांचा विरोध आहे.
याबाबत सर्व छप्परपट्टी धारक छोटे मोठे व्यापारी यांची व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांच्या उपस्थितीत बैठक होऊन याबाबत मुख्याधिकारी यांची भेट घेऊन आपली कैफीयत मांडण्याचा व त्याबाबतचे निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.याप्रमाणे सोमवारी संदीप मालपेकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व छप्परपट्टी धारक छोटे मोठे व्यापारी यांनी मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांची भेट घेतली व याबाबत चर्चा करून त्यांना लेखी निवेदन दिले. नगर परिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात मुख्याधिकारी प्रशांत भोसले, मुख्य लिपिक जितेंद्र जाधव यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा केली.
गेले कित्येक वर्षे सहामाही छप्परपट्टी आकारणी केली जात असून तीच योग्य असून अचानक अशा प्रकारे दैनंदिन कर आकारणी न करता याबाबत काहीतरी सुवर्णमध्ये काढावा अशी मागणी यावेळी व्यापाऱ्यांनी केली. याप्रसंगी व्यापारी संघाचे संदीप मालपेकर, दिनानाथ कोळवणकर, अभय मेळेकर यांनी व्यापाऱ्यांची भूमिका मांडली. तर यावेळी उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष एड. जमिर खलिफे व माजी नगरसेवक सुलतान ठाकूर यांनीही अशा प्रकारे छप्परपट्टीत वाढ करू नये यातुन योग्य मार्ग काढावा अशी मागणी केली.
याबाबत आपण नक्कीच आपणाशी चर्चा करून काहीतरी मार्ग काढू अशी ग्वाही यावेळी मुख्याधिकारी भोसले यांनी दिली. यासाठी व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित करून यात चर्चा करून मगच निर्णय घेतला जाईल असेही भोसले यांनी नमुद केले.
याप्रसंगी शहरातील छप्परपट्टी धारक छोटे मोठे व्यापारी मोठया संख्येने उपस्थित होते.
या सर्व व्यापाऱ्यांनी नगर परिषदेने छप्परपट्टी वाढीबाबत व दैनंदिन करआकारणीबाबत दिलेल्या नोटीसीला लेखी उत्तर देत आपल्या हरकती नोंदविल्या आहेत.











