प. पू.भालचंद्र महाराज संस्थानतर्फे १० क्षयरुग्णांना धान्य किट वाटप….!

कणकवली –
परमहंस भालचंद्र महाराज संस्थान, कणकवली यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत नुकतेच गरजू व गरीब क्षयरुग्णांना धान्य किटचे वाटप करण्यात आले. क्षयरोगाने ग्रस्त रुग्णांना पौष्टिक आहार मिळावा व त्यांच्या उपचारांना पूरक मदत व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

संस्थानतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांपैकी हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम असून प्रत्येक लाभार्थ्यास तांदूळ, तेल, कडधान्य तसेच इतर आवश्यक जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेले धान्य किट देण्यात आले. या उपक्रमामुळे गरजू क्षयरुग्णांना उपचार काळात आवश्यक पोषण मिळण्यास मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

या प्रसंगी समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देणे हीच खरी सेवा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. भविष्यातही अशा प्रकारचे सामाजिक व समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती संस्थानतर्फे देण्यात आली. या उपक्रमाबद्दल लाभार्थी रुग्णांनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी संस्थानचे आभार मानले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र सिंधुदुर्ग डॉ. दिपा देशपांडे,आरोग्य पर्यवेक्षक किशोर लाड,लीलाधर सोमजी, नितीन नाईक, जयदीप वावळीये, आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे तसेच क्षयरोग पर्यवेक्षक संभाजी नांदगावकर
आदी उपस्थित होते.

तसेच संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत, निवृत्ती धडाम, दादा नार्वेकर, विश्वस्त मुरलीधर नाईक, प्रसाद अंधारी, नागेश मुसळे तसेच व्यवस्थापक विजय केळूसकर आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.