नांदगाव-खारीतील उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

खेड (प्रतिनिधी) : शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन शिवसेनेच्या परिवर्तनकारी समाजकारणात योगदान देण्याच्या उद्देशाने खेड तालुक्यातील नांदगाव व खारी गावातील उबाठा गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा खेड तालुक्यातील जामगे निवासस्थान येथे पार पडला.

यावेळी नांदगाव-खारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री. राजेश पालकर व सौ. पालकर, तसेच श्री. विनोद बहुतुले यांच्या नेतृत्वाखाली असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षनिष्ठा व्यक्त केली. शिवसेना नेते मा. श्री. रामदास भाई कदम, गृह राज्यमंत्री मा. श्री. योगेश दादा कदम आणि दयाळ जिल्हा परिषद गटाचे सदस्य मा. श्री. अरुण उर्फ आण्णा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी नव्याने प्रवेश केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करत पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. खेड तालुक्यात शिवसेना अधिक बळकट करण्यासाठी हा प्रवेश महत्त्वाचा ठरणार असल्याचेही यावेळी मान्यवरांनी सांगितले.

या कार्यक्रमाला शिवसेना तालुकाप्रमुख व सुकिवली जिल्हा परिषद गटाचे सदस्य श्री. सचिन धाडवे, पंचायत समिती उपसभापती श्री. सुनिल मोरे, दयाळ गणाच्या पंचायत समिती सदस्या सौ. शमिका म्हादे, बहीरवली पंचायत समिती गणाचे सदस्य श्री. निसार सुर्वे, भडगाव पंचायत समिती गणाचे सदस्य श्री. संग्राम कदम, विभाग प्रमुख श्री. सुनिल पवार यांच्यासह शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी व युवती सेनेच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.