नगर परिषदेच्या कारवाईत अडथळा
राजापूर (वार्ताहर): राजापूर नगर परिषदेच्या वतीने शहरातील शिवाजी पथ ते बाजारपेठ भागात सुरू असलेल्या अनधिकृत मासेविक्रीवर कारवाई करण्यात आली. यावेळी नगर परिषद कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी १३ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर परिषदेचे स्वच्छता मुकादम राजन रामचंद्र जाधव (५५) यांनी याप्रकरणी राजापूर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार दि. १३ मार्च रोजी राजापूर नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक अमित पोवार आणि इतर सफाई कर्मचाऱ्यांसह वरिष्ठांच्या आदेशानुसार शिवाजी पथ परिसरात कारवाईसाठी गेले होते. या ठिकाणी अनेक महिला मासळी मार्केटमध्ये न बसता रस्त्यावरच अनधिकृतपणे मासे विक्री करत होत्या. नगर परिषदेच्या पथकाने त्यांना मच्छी मार्केटमध्ये बसण्याबाबत वारंवार सूचना दिल्या, मात्र संबंधित महिलांनी तेथून हलण्यास स्पष्ट नकार दिला. व तिथेचे मासे विक्री करणे सुरू ठेवले. त्यांच्या या कृतीमुळे परिसरात दुर्गंधी आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
काही महिला रस्त्यावरच मासे साफ करत असल्याने माशांची खवले आणि सांडपाणी यामुळे बाजारपेठ परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. यामुळे पादचारी, स्थानिक व्यापारी आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याच्या तक्रार पालिकेकडे प्राप्त झाली होती. वारंवार सूचना देऊनही या महिला सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणी सुमैया बोरकर, नाजिया वाडकर, निलोफर होडेकर, अक्सा सोलकर, मिनाज भाटकर, रुक्साना बोरकर, अनिसा सोलकर, अक्सा पावसकर, नाजिया मंचेकर, मुमताज पिरकर, शबाना काझी, मुमताज फडणीस आणि नसरीन सोलकर (सर्व रा. नाटे, कातळी, कोंढे इ.) या १३ महिलांविरुद्ध महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५: कलम २६७ आणि २६९ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१: कलम ११५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे राजापूर बाजारपेठ परिसरात खळबळ उडाली असून, यापुढेही अनधिकृतपणे रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा नगर परिषद प्रशासनाने दिला आहे.










