तांबे मोहल्ल्यात भीषण आग; रमजान ईदच्या तोंडावर कुटुंबाचे मोठे नुकसान

खेड (प्रतिनिधी) : खेड शहरातील तांबे मोहल्ला परिसरात रविवारी रात्री सुमारे साडे आठ वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले असून रमजान ईद अगदी तोंडावर आलेली असताना कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आगीची माहिती मिळताच भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक (गटनेते) रहीम सहीबोले, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस मिलिंद नांदगावकर, आमीर महाडीक तसेच अनेक कार्यकर्ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनीही आग विझवण्यासाठी मदतीसाठी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच खेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. यावेळी भरणे नाका येथील शिरीषकर वॉटर सप्लायर्सचे गणेश शिरीषकर यांनीही आपल्या पाण्याच्या टँकरसह तात्काळ घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला मदत केली.
अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अखेर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र या आगीत घरातील मोठ्या प्रमाणात संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून काही दिवसांतच ईद सण साजरा होणार असताना ही दुर्घटना घडल्याने संबंधित कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून अधिक तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.