हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत होणार
लांजा (प्रतिनिधी) :गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत यात्रा समिती लांजाच्या वतीने गुरुवारी १९ मार्च रोजी
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी ढोल-ताशांच्या गजरात लांजा शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.
नववर्ष स्वागत समिती लांजा च्या वतीने दरवर्षी गुढी पाडव्याचे औचित्य साधून नववर्षाच्या स्वागतासाठी लांजा शहरातून भव्य स्वरूपात स्वागतयात्रा काढण्यात येते. अशाच प्रकारे गुरुवारी १९ मार्च रोजी लांजा गावचे जागृत ग्रामदैवत श्री धनी केदारलिंग येथून या शोभा यात्रेला सायंकाळी ५ वाजता सुरुवात होणार आहे. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात ही मिरवणूक नाईकवाडी मार्गे श्री पौलस्तेश्वर देव मंदिर, शेट्येवाडी ते पुन्हा लांजा शहरातून श्रीराम मंदिर अशी काढण्यात येणार आहे.
या मिरवणुकीत लांजा शहरातील नागरिकांनी आपल्या संस्कृतीप्रमाणे पारंपारिक वेशात सहभागी व्हावे, असे आवाहन नववर्ष स्वागत समिती लांजा च्या वतीने करण्यात आले आहे.












