वार्तापत्र-कोकण/ संतोष वायंगणकर
रायगड जिल्हा परिषदेत एककाळ ज्या पक्षाचे वर्चस्व होते तो शेतकरी कामकरी पक्ष मात्र आजच्या घडीला अस्तित्वहित झाला आहे. गेल्याकाही वर्षात राज्यातही शेकापची पिछेहाट झाली. सहाजिकच रायगडच्या राजकारणातही यावेळच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शेतकरी कामकरी पक्षच हद्दपार झाला आहे. कोकणात फक्त रायगड जिल्ह्यातच शेतकरी कामकरी पक्षाचे अस्तित्व होते. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात तर शेकापच अस्तित्व केव्हाचच संपल आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोकणातील राजकारणात नविन राजकीय समिकरण उदयाला येत आहेत. कोकणात या जिल्हा परिषद निवडणुकीत रायगड ते सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवारगट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरेगट) या महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचेही अस्तित्व शोधावे लागेल अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली आहे…
राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणुक पार पडली. महाराष्ट्रातील अनेक भागात काही ठिकाणी महायुतीत सूर जुळले. तर काही ठिकाणी जुळलच नाही. परंतु तरीही ‘मैत्री’पूर्ण च्या नावाखाली निवडणुका पार पडल्या. तर काही ठिकाणी भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदेगट व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट या महायुतीतर्फे निवडणुक लढविली गेली. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत एक-दुसऱ्या समोर विरोधात निवडणुका लढवुन आता एकत्र येत सत्तेत सहभागी होताना दिसत आहेत. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगट या महायुतीच्या माध्यमातून निवडणुक लढविण्यात आली. आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गात महायुतीला चांगल यशही प्राप्त करता आलं. रायगड जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगट यांच्यात युतीतून निवडणुक लढविण्यात आली. शिवसेना शिंदेगटाने स्वतंत्र निवडणुक लढविली. या निवडणुकीत रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला सर्वाधिक २१ जागा जिंकता आल्या. बहुमताची मॅजिक फीगर एकट्या शिंदे शिवसेनेला गाठता आली नाही. यामुळे रायगड जिल्ह्यात कुणा एका पक्षाला बहुमत प्राप्त झाले नाही. मात्र महायुतीची सहज सत्ता स्थापन करण्याची संधी मात्र जनतेने महायुतीला दिली. १२ मार्चला रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड झाली.
रायगडमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपद सव्वा-सव्वा वर्षाच्या ‘फॉर्मुल्या’ नुसार पहिल्या सव्वा वर्षाला अध्यक्षपद भाजपाला तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्याचा निर्णय झाला. सद्यस्थितीत रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेत शिवसेना शिंदेगट सहभागी झाला आहे. मात्र २३ मार्चला होणाऱ्या विषय समिती निवडीत शिंदे सेनेला सहभागी करून घेतले जाईल असे अपेक्षित आहे. मात्र, रायगडच्या राजकारणात शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या दोन्ही पक्षांमध्ये विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. त्याच प्रत्यंतर रायगड जिल्ह्याच्या राजकारणातून जागो-जागी पहायला मिळत असते. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत गेले वर्षभर चर्चा सुरू होती. तटकरे, गोगावले यांच्यातील वादही सर्वश्रृत आहे. याचे परिणाम अधून-मधून रायगडच्या राजकारणात डोकावत असतात. अगदी टोकावरचे संघर्षाचे वातावर होत असतात. मात्र, राजकारणात दिर्घकाळ कोणीही कोणाचा शत्रू नसतो की मित्रही नसतो. राजकारण सारं काही समझोता असतो. तसच काहीस राजकारण सध्या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पहायला मिळत आहे. रायगड जिल्हा परिषदेत एककाळ ज्या पक्षाचे वर्चस्व होते तो शेतकरी कामकरी पक्ष मात्र आजच्या घडीला अस्तित्वहित झाला आहे. रायगडमधील पाटील बंधूची दिर्घकाळ रायगड जिल्हा परिषदेत सत्ता होती. याच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याच्या राजकारणावर शेकापची हुकमत राहिली. परंतु गेल्याकाही वर्षात राज्यातही शेकापची पिछेहाट झाली. सहाजिकच रायगडच्या राजकारणातही यावेळच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शेतकरी कामकरी पक्षच हद्दपार झाला आहे. कोकणात फक्त रायगड जिल्ह्यातच शेतकरी कामकरी पक्षाचे अस्तित्व होते. कोकणातील सिंधुदुर्गात कै.शि.स. सावंत हे ६० ते ७० च्या दशकात शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होते. त्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात तर शेकापच अस्तित्व केव्हाचच संपल आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोकणातील राजकारणात नविन राजकीय समिकरण उदयाला येत आहेत. कोकणात या जिल्हा परिषद निवडणुकीत रायगड ते सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवारगट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरेगट) या महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचेही अस्तित्व शोधावे लागेल अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड व्हायची आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समिती सभापती निवडीचाही फॉर्मुला ठरलेला आहे. त्याप्रमाणे निवडप्रक्रिया होणार आहे. कोकणातील राजकारणातील जुळवा-जुळव महायुतीच्या राजकारणात तर जुळविण्यात नेत्यांना निश्चितच यश आले आहे. कोकणात राष्ट्रीय काँग्रेस बरोबरच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाही अस्तित्वहिन बनत चालली आहे. कोकणात उबाठाचे एकमेव आमदार भास्कर जाधव हे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मतदार संघातून निवडून आले आहेत. बाकी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही आमदार निवडून आलेले नाहीत. खासदार विनायक राऊत लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यातच माजी खासदार विनायक राऊत आणि आ.भास्कर जाधव, माजी आमदार वैभव नाईक यांच फार सख्य नाही. नगरपालिका निवडणुक काळात रत्नागिरी जिल्ह्यात माजी खासदार विनायक राऊत गटबाजी कशी करतात याचा पाढाच आ.भास्कर जाधव यांनी जाहिरपणे वाचला आहे. त्यामुळे कोकणात शिवसेना नेतृत्वहिन आहे. जे शिवसेनेत नेते म्हणवून होणारे आहेत ते कशाप्रकारे उबाठाच्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत हे देखिल आपण पाहिले आहे. मातोश्रीकडून उबाठाचे सचिव विनायक राऊत यांना अधिकचे झुकते माफ दिले जात असल्याने कोकणातील शिवसैनिकातही प्रचंड नाराजीचा सूर आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत एक-दोन उबाठा सेनेचे जिल्हा परिषद सदस्य निवडून आले. ते देखिल उबाठाच्या ताकदीवर निवडून आलेले नाहीत तर स्वत:च्या ताकतीवर निवडून आले. त्यांनी देखिल आवळया-भोपळ्याची वेगळीच मोट बांधली आहे. कोकणात एकिकडे रायगड जिल्ह्यात पूर्वी दिसणारा शेतकरी, कामकरी पक्ष यावेळच्या निवडणुकीत हद्दपार झाला आहे. कोकणात राष्ट्रीय काँग्रेस अस्तित्वहिन झालीच आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची वाटचालही त्याचदिशेने होताना दिसत आहे.













