राजू शेट्टी यांच्या वक्तव्याच्या सिंधुदुर्ग ऍग्रो मार्केटीयर्स असोसिएशनने केला निषेध

बागायतदार सुसंस्कृत आणि सुज्ञ

कृषी विक्रेत्यांना धमकावणे चुकीचे

कणकवली : यावर्षी आंबा बागायतदारांवर ओढवलेली आपत्ती ही पूर्णपणे नैसर्गिक असून त्यामध्ये कीटकनाशके विक्रेत्यांना जबाबदार धरण्याचा प्रश्न येत नाही. परंतु शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी १२ मार्च २०२६ रोजी ओरोस येथील शेतकरी आक्रोश मोर्चाला संबोधित करताना, वस्तुस्थिती लक्षात न घेता विक्रेत्यांचे उधारीचे पैसे देऊ नयेत व मागितल्यास दुकानातील माल बाहेर काढा. काही कारवाई झाल्यास मी बघून घेईल असे वक्तव्य केल्यामुळे कृषी सेवा केंद्र चालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि त्यांच्या या वक्तव्याच्या परिणाम स्वरूप काही कार्यकत्यांकडून विक्रेत्यांना धमकावले जाण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. राजू शेट्टी यांच्या या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. अशी भूमिका सिंधुदुर्ग ऍग्रो मार्केटीयर्स असोसिएशन, सिंधुदुर्गचे पदाधिकारी यांनी मांडली आहे.

या संदर्भात सिंधुदुर्ग मार्केटीयर्स असोसिएशन, सिंधुदुर्गचे अध्यक्ष हेमंत सावंत, उपाध्यक्ष ऋषिकेश परब, सचिव पंकज दळी, स्वप्निल चमणकर ,एकनाथ तेली, विनायक जोईल यांच्यासह सदस्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करत आपल्या भावना मांडल्या त्यानंतर कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत असोसिएशनतर्फे भूमिका मांडली.
यावेळी हेमंत सावंत म्हणाले, यावर्षी सिधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबा व काजू पिकाला हवामानातील लहरीपणामुळे खूप नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. ही नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू, बागायतदारांना भरघोस निधी उपलब्ध होणे बाबत शासकीय पातळीवर प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार यांचे आमचे जिव्हाळ्याचे नाते आहे, गेली कित्येक वर्ष आम्ही हातात हात घालून एकमेकांचे व्यावसायिक हितसंबंध जपले आहेत. बागायतदारांना लागणारी खते, कीटकनाशके दरवर्षी मोठ्या प्रमाणावर आमचे विक्रेते उधारीवर देत असतात (अंदाजे ९० कोटी रूपये) आणि बरेचसे शेतकरी त्याचा वेळेत परतावा सुद्धा करत असतात. काही शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर उधारी येणे आहे पण हा व्यवसायाचा भाग झाला. मात्र आमचे बागायतदार सुसंस्कृत आणि सुज्ञ असून त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. कोकणी शेतकऱ्यांची ही संस्कृती नाही. मात्र शेतकरी नेते राजू शेट्टी चिथावणीखोर वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. आमच्या काही विक्रेत्यांना धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. आम्ही आंबा बागायतदार आणि शेतकरी यांच्या बाजूने आहोत. शेतकरी जगला तरच आम्ही जगणार आहोत याची जाणीव आम्हाला आहे. कारण ही एक साखळी आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाहक गैरसमज करून देण्याचे प्रकार करू नयेत.अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी व आंबा काजू बागायतदारांना मोठ्या प्रमाणावर मदत मिळावी पुढाकार घेणे गरजेचे आहे. आमच्या अनेक कृषी सेवा केंद्र चालकांनी बँकांची कर्ज काढून व्यवसाय सुरू केले आहेत आणि हे व्यवसाय शेतकऱ्यांवर अवलंबून आहेत आमचा व्यवसाय हा विश्वासावर चालणारा व्यवसाय असून शेतकरी आणि आमचे वेगळे नाते आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाहक गैरसमज निर्माण करून आम्हाला आर्थिक संकटात टाकण्याचा प्रयत्न करू नये . असेही हेमंत सावंत व पदाधिकारी म्हणाले.

फोटो
कणकवली येथे पत्रकार परिषदेत बोलताना सिंधुदुर्ग मार्केटीयर्स असोसिएशन, सिंधुदुर्गचे अध्यक्ष हेमंत सावंत, उपाध्यक्ष ऋषिकेश परब, सचिव पंकज दळी, स्वप्निल चमणकर ,एकनाथ तेली, विनायक जोईल