वेरवली-रामगाव येथील ७५ वर्षीय महिलेचा खून करून सोन्याचे दागिने लुटले; तीन स्वतंत्र तपास पथकांची कामगिरी
लांजा, प्रतिनिधी : लांजा तालुक्यातील वेरवली-रामगाव येथील लाडवाडी परिसरात राहणाऱ्या ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक महिलेचा खून करून त्यांच्या हातातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून नेल्याच्या गंभीर गुन्ह्याचा रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अवघ्या १२ तासांत उलगडा केला आहे. या प्रकरणी प्रमोद प्रकाश खेडेकर (रा. वेरवली खुर्द, कातळवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी) याला अटक करण्यात आली आहे. स्थानिक माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि तीन स्वतंत्र तपास पथकांच्या समन्वित प्रयत्नांतून पोलिसांनी ही कारवाई केली.
घरात एकट्या असताना महिलेचा खून
वैशाली विलास हेगिष्टे (वय ७५) या १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत आपल्या घरी एकट्या असताना अज्ञात व्यक्तीने त्यांचा खून केला. त्यानंतर त्यांच्या दोन्ही हातांतील सोन्याच्या दोन बांगड्या आणि दोन पाटल्या जबरदस्तीने काढून नेण्यात आल्या. त्यांच्या हातात नकली बांगड्या घालण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे.
या घटनेप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ३०९(४) आणि ३३२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा निश्चित केली.
त्यानुसार लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे आणि राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या समन्वयातून तीन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली.
या पथकांनी स्थानिक माहितीचे संकलन, संशयितांची पडताळणी आणि तांत्रिक विश्लेषण यावर भर दिला. विविध दिशांनी समांतर तपास करत उपलब्ध माहितीची पडताळणी करण्यात आली. तपास पथकांमधील समन्वय आणि वेगवान कारवाईमुळे काही तासांतच महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले.
घटनास्थळापासून दीड किलोमीटर अंतरावरील संशयिताला अटक
तपासादरम्यान घटनास्थळापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या प्रमोद प्रकाश खेडेकर याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. कर्जबाजारीपणामुळे हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलीस विभागाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली.
तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे
१. लांजा पोलीस ठाणे
- म. स. पोलीस निरीक्षक देवकन्या मैदाड
- पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले
- पोलीस अंमलदार सचिन भुजबळराव
- पोलीस अंमलदार नितेश राणे
- पोलीस अंमलदार प्रियंका कांबळे
- पोलीस अंमलदार प्रतीक्षा राणे
- श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय मारळकर
२. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी
- श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले
- श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बोरकर
- पोलीस हवालदार विजय आंबेकर
- पोलीस हवालदार गणेश सावंत
- पोलीस हवालदार योगेश वाघेकर
- पोलीस हवालदार भैरवनाथ सवाईराम
- चालक पोलीस हवालदार दत्ता कांबळे
- चालक पोलीस अंमलदार अतुल कांबळे
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे आणि राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक माहितीचे संकलन, तांत्रिक विश्लेषण, संशयितांची पडताळणी आणि तीन स्वतंत्र तपास पथकांमधील समन्वय यामुळे गंभीर गुन्ह्याची अवघ्या १२ तासांत उकल करण्यात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला यश आले.











