सरपंच व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व जिवे मारण्याची धमकी
शासकीय साहित्याचे नुकसान : संशयितावर सावंतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
सावंतवाडी | प्रतिनिधी :
तालुक्यातील माडखोल ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी एका ग्रामस्थाने जोरदार राडा घालत सरकारी साहित्याची तोडफोड केल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकारणी कार्यालयातील संगणक, प्रिंटर व इतर साहित्याचे नुकसान करून सरपंच व कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ व ‘ग्रामपंचायत पेटवून देईन’ अशी धमकी दिल्याप्रकरणी संशयित गुरुनाथ सोनू राऊळ (रा. माडखोल) याच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, माडखोल ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच आणि लिपिक आपले दैनंदिन प्रशासकीय कामकाज करत होते. यावेळी संशयित गुरुनाथ राऊळ हा कोणत्यातरी कामाचा दाखला घेण्यासाठी कार्यालयात आला होता. मात्र, दाखल्याच्या प्रक्रियेवरून किंवा अन्य कारणावरून त्याचा कर्मचाऱ्यांशी वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, संशयिताने रागाच्या भरात कार्यालयातील टेबलावर असलेले संगणक, प्रिंटर व इतर शासकीय कागदपत्रे फेकून देऊन अस्ताव्यस्त केली. यात शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
केवळ साहित्याची फेकाफेक करून न थांबता, राऊळ याने उपस्थित सरपंच व कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच “ग्रामपंचायत पेटवून देईन,” अशी धमकी दिल्याने परिसरात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर विद्यमान सरपंचांनी तात्काळ सदस्यांसह सावंतवाडी पोलीस ठाणे गाठले आणि घडल्या प्रकाराची रीतसर तक्रार दिली.
या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आणि दहशत निर्माण करणे या कलमान्वये संशयितावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या घटनेचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस करत असून, शासकीय कार्यालयात लोकप्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अशा हल्ल्यांबाबत संताप व्यक्त केला जात आहे.













