विलवडेत अनधिकृत क्वारी, क्रशर बंद करण्यासाठी स्थानिकांचे धरणे आंदोलन 

महिलांची लक्षणीय उपस्थिती : महसूल प्रशासन विरोधात संताप 

बांदा : प्रवीण परब 

 

विलवडे आणि वाफोली गावांमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत क्रशर व क्वारी कायमस्वरूपी बंद कराव्यात या मागणीसाठी विलवडे, वाफोली, भालावल व डेगवे गावातील ग्रामस्थ आक्रमक बनले आहेत. शासन दरबारी वारंवार दाद मागूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आज सकाळपासून विलवडे क्रशरकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठाण मांडून धरणे आंदोलन सुरू केले आहे.

 

यावेळी स्थानिकांच्या तीव्र प्रतिक्रिया होत्या. दिवसरात्र सुरु असणाऱ्या भुसुरुंग स्फ़ोटांमुळे घरांच्या भिंतीना तडे गेले आहेत. परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे स्थानिकांचे श्वसनाचे आजार बळावले आहेत. एकूणच स्थानिकांचे भवितव्य धोक्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले.

 

स्थानिक सन २०१७ पासून अनधिकृत क्वारी व क्रशर विरोधात लढा देत आहेत. बहुतांशी क्रशर व क्वारी अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा स्थनिकांनी आरोप केला. जोपर्यंत अनधिकृत व्यवसाय कायमचे बंद होत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही, असा निर्धार यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला.

 

या आंदोलनाला डॉ. जयेंद्र परुळेकर, रानमाणूस प्रसाद गावडे, ऍड. ऋषिकेश देसाई, विलवडे सरपंच प्रकाश दळवी, विलास सावंत, माजी उपसभापती कृष्णा सावंत, मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी पाठिंबा दिला. आंदोलन स्थळी विलवडे, वाफोली, भालावल व डेगवे गावातील ग्रामस्थ, महिला आणि शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले आहेत. बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात आहे.