खेड (प्रतिनिधी) : लवेल येथील नामांकित Gharada Institute of Technology येथे १३ आणि १४ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक महोत्सव “शोध २०२६” मोठ्या उत्साहात पार पडला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रांतील विद्यार्थ्यांना आपली कौशल्ये सादर करण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांसह डिप्लोमा आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत महोत्सवाला प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संगणक अभियांत्रिकी एआयएमएल विभागप्रमुख प्रा. एस. डी. लाटकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून घरडा फाउंडेशनचे हेड ऑफ ऑपरेशन्स अँड सोशल इनिशिएटिव्ह्ज गोपाल थम्पी उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणातून डॉ. घरडा यांच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्याच्या ध्येयाविषयी माहिती देत, शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकास साधण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. एस. के. पाटील होते. त्यांनी संस्थेमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक आणि तांत्रिक उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांना संशोधनाभिमुख विचारसरणी जोपासण्याचे आवाहन केले. महोत्सवाचे समन्वयक डॉ. अरुण ढंग यांनी आभार प्रदर्शन केले.
दोन दिवस चाललेल्या या महोत्सवामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा अॅनालिटिक्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, ग्रीन एनर्जी, इंडस्ट्रियल सेफ्टी, थ्री-डी प्रिंटिंग आणि टाऊन प्लॅनिंग यांसारख्या अत्याधुनिक विषयांवर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख होण्याबरोबरच त्यांच्या संशोधनात्मक दृष्टीकोनाला चालना मिळाली.
महोत्सवांतर्गत पेपर प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, टेक्निकल क्विझ, बिझनेस प्लॅन, इंडस्ट्रियल सेफ्टी चॅलेंज, कॅड मॉडेलिंग आणि सर्किट डिझाईनिंग अशा विविध स्पर्धा पार पडल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्ष प्रोटोटाइपच्या स्वरूपात सादर करत परीक्षकांचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे डिप्लोमा महाविद्यालयांबरोबरच अकरावी-बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनीही या महोत्सवात सहभाग घेतला. त्यांच्यासाठी लॅन गेमिंग आणि बॉक्स क्रिकेट यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवाचे आणखी एक आकर्षण म्हणजे मेकॅनिकल विभागातर्फे आयोजित करण्यात आलेला भव्य ऑटो एक्स्पो होय. या प्रदर्शनामध्ये Tata Motors, Hyundai Motor Company, Maruti Suzuki, Honda आणि Suzuki यांसारख्या नामांकित कंपन्यांनी आपल्या विविध कार आणि दुचाकी मॉडेल्सचे प्रदर्शन मांडले होते. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वाहनांची माहिती प्रत्यक्ष पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. तसेच आकर्षक स्पोर्ट्स बाइक्स आणि मॉडिफाइड कार्सचे प्रदर्शनही उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.
या तांत्रिक महोत्सवात ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे “शोध २०२६” हा महोत्सव यशस्वीरीत्या संपन्न झाला.










