खेड (प्रतिनिधी) : राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुक्या7तील चंदी हवेली येथे भव्य लॅपटॉप वितरण सोहळा उत्साहात पार पडला. खेड तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा करटेल गावचे सुपुत्र दिनेश परशुराम चव्हाण यांच्या संकल्पनेतून CSR निधीच्या माध्यमातून तालुक्यातील ४१ जिल्हा परिषद शाळांना लॅपटॉपचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, सरपंच दिनेश चव्हाण, भगवान साळुंखे, दयानंद पाष्टे यांच्यासह विस्तार अधिकारी संतोष भोसले, सुनिल सावंत, संतोष चव्हाण, कोळेकर, मगदूम, दळवी, खोपडे, घाग, शिंदे, तांबट, सौरभ जाधव तसेच ग्रामस्थ व शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंदी हवेली येथील प्रशस्त हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध करून देण्यासाठी कळंबणी गावचे सरपंच भगवान साळुंखे यांनी विशेष प्रयत्न केले.
राज्यमंत्री योगेश कदम यांचा वाढदिवस १८ फेब्रुवारी रोजी असला तरी त्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. तसेच अधिवेशनाच्या व्यस्ततेमुळे योगेश कदम स्वतः उपस्थित राहू शकले नाहीत, त्यामुळे कार्यक्रम अत्यंत साधेपणाने पार पडला.
या उपक्रमामागील मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हा असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. तालुक्यातील शाळांना आधुनिक साधनसामग्री मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत निश्चितच भर पडणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी सरपंच दिनेश चव्हाण यांच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन भगवान साळुंखे यांनी मानले. शेवटी अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.











