गुहागर प्रतिनिधी:
गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल अभियांत्रिकी विभागातर्फे “Advanced Surveying Technology: Total Station & Drone Survey” या विषयावर ४० तासांची मूल्यवर्धित कार्यशाळा पार पडली. दि. ९ मार्च २०२६ ते १४ मार्च २०२६ या सहा दिवसीय कालावधीत यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेसाठी पराग दावणे Founder & Director, Techstars Engineering Services, कोल्हापूर) हे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या कार्यशाळेत एकूण २६ जणांनी सहभाग घेतला.
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना आधुनिक सर्व्हेइंग तंत्रज्ञानाची ओळख, पारंपरिक व आधुनिक सर्व्हे पद्धतींची तुलना, तसेच टोटल स्टेशन या उपकरणाची रचना, कार्यपद्धती, कोऑर्डिनेट सिस्टीम, सर्व्हे नियोजन व क्षेत्रातील अचूक मोजमाप पद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी टोटल स्टेशनद्वारे ट्रॅव्हर्सिंग, लेव्हलिंग, टोपोग्राफिक सर्व्हे, कंटूर मॅपिंग व डेटा डाउनलोडिंग यासारख्या प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे सर्व्हेचे कौशल्य आत्मसात केले.
याशिवाय कार्यशाळेत ड्रोन सर्व्हेइंग तंत्रज्ञानाची मूलभूत माहिती, विविध प्रकारचे ड्रोन, DGCA नियम व सुरक्षा उपाय, तसेच सिव्हिल अभियांत्रिकी प्रकल्पांमधील त्याचा वापर याविषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना फ्लाइट प्लॅनिंग, मिशन एक्झिक्युशन, ग्राउंड कंट्रोल पॉइंट्स (GCPs), डेटा कलेक्शन व ड्रोन ऑपरेशनमधील सुरक्षितता याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. पुढे ड्रोनद्वारे संकलित केलेल्या डेटाचे प्रोसेसिंग, ऑर्थोमोजॅक तयार करणे, मॅपिंग व व्हॉल्यूम कॅल्क्युलेशन याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक सर्व्हेइंग उपकरणांचा प्रत्यक्ष वापर, डेटा प्रोसेसिंग व मॅपिंग तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळाले. भविष्यात इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प, कन्स्ट्रक्शन कंपन्या तसेच सर्व्हेइंग क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी हे कौशल्य उपयुक्त ठरणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना स्वतःचा ड्रोन सर्व्हे किंवा सर्व्हेइंग कन्सल्टन्सी स्टार्टअप सुरू करण्यासाठीही या प्रशिक्षणाचा मोठा फायदा होणार असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
ही कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, सदस्य श्री. जयंत कयाळ, महाविद्यालये प्राचार्य डॉ. अविनाश पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेचे संयोजक प्रा. नंदकिशोर चौगुले (सिव्हिल विभाग प्रमुख), कार्यक्रम समन्वयक म्हणून प्रा. मंदार पावरी यांनी काम पाहिले. आयोजन समितीत प्रा. रिया गवस, प्रा. अनिकेत जाधव, प्रा. फैजान सय्यद व श्री. संजीव रहाटे यांचा समावेश होता. तसेच महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुखांनी सल्लागार समिती सदस्य म्हणून सहकार्य केले.











