“माझा वेंगुर्ला ” च्या उपक्रमाला वेंगुर्लेवासियांचा प्रतिसाद
वेंगुर्ले : दाजी नाईक l वेंगुर्ले येथे “माझा वेंगुर्ला ” आयोजित पावसाळ्यात उगवणाऱ्या दुर्मिळ रानभाज्यांच्या जतन व संवर्धनासाठी भव्य ‘पाककृती स्पर्धा व प्रदर्शनाला’ वेंगुर्लेवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी कांगुल्याच्या भाजीचे वडे, एरंडाचे सूरवन, मिक्स भाजीचे कटलेट या मांडलेल्या विविध दुर्मिळ अशा रानभाज्यांची पाककृती सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.
पावसाच्या आगमना सोबतच सर्वांना उत्सुकता असते आपल्या कोकणच्या रानावनात उगवणाऱ्या अनेक दुर्मिळ औषधी आणि रानमोळी चवदार रानभाज्यांची. या अल्पपरिचित रानभाज्यांची चव, औषधी महत्व, उपयोग आणि त्यापासून बनवता येणाऱ्या चवदार पाककृती यांची माहिती युवा पिढीला होण्यासाठीच हा उपक्रम “माझा वेंगुर्ला ” ने सलग सातव्या वर्षी आयोजित केला होता. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भव्य प्रदर्शनात्मक रानभाजी पाककृती स्पर्धा वेंगुर्ले पाटकर हायस्कूल नजीक स्वामिनी मंडपम येथे आयोजित करण्यात आली होती. पाककृती स्पर्धेत सौ. श्रेया अजित रेडकर यांनी बनविलेल्या कागुजाच्या भाजीचे वडे याला प्रथम क्रमांक मिळाला. त्यांना पॉप्युलर क्लॉथ सेंटरचे अमर दाभोलकर यांच्याकडून ठेवलेली पैठणी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेत व्दितीय क्रमांक सौ. स्मिता राजाराम नाईक- एरंडाचे सूरवन आणि तृतीय क्रमांक पुर्वा जीवन परब – मिक्स भाजीचे कटलेट यांनी मिळविला. त्यांना नरेश गावडे पुरस्कृत बक्षिस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी उत्तेजनार्थ सहा क्रमांक काढण्यात आले. यामध्ये अनुक्रमे सौ. रेखा पुरुषोत्तम नाईक – लाजरीची कढी, सौ. सुजाता गुरुदास साटम – आघाडा मोमोज, सौ. श्रावणी श्रीकृष्ण भोगटे – पवण्याची वडी, श्री महादेव लक्ष्मण मेस्त्री – पुनर्नवाची भाजी, श्रीमती सुप्रिया सुभाष हळदणकर – भरलेली करटुले, सौ. सुमित्रा महेश सावंत – निवडुंगाचे पातोळे यांचा समावेश आहे.
या उत्सवाचे उद्घाटन वेंगुर्ले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माझा वेंगुर्ल्याचे कार्याध्यक्ष संजय पुनाळेकर, प्रायोजक नागेश गावडे, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, तसेच राजा शृंगारे, बाळा शिरसाट, राजन गावडे प्रा. धनश्री पाटील यांच्यासह स्पर्धेचे परीक्षक डॉक्टर अमोल दुधगावकर, डॉक्टर सचिन पुराणिक, डॉक्टर सुधीर निगुडकर आदी उपस्थित होते. सर्वच मान्यवरांनी माझा वेंगुर्ल्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पुनाळेकर यांनी तर सूत्रसंचालन व आभार शशांक मराठे यांनी मानले.












