खेड येथे ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणद रस्ते योजना’ची पहिली बैठक संपन्न

दापोली प्रतिनिधी :शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत रस्ते सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना समितीची विधानसभा क्षेत्रस्तरीय पहिली बैठक खेड येथील उपविभागीय कार्यालयात पार पडली. या बैठकीस समितीचे अध्यक्ष किशोर देसाई अध्यक्षस्थानी होते.
बैठकीला उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार सुधीर सोनावणे, डीवायएसपी शैलेश सणस तसेच जिल्हा परिषद गट सदस्य अरुण (अण्णा) कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी योजनेचा उद्देश, निकष आणि उपविभागीय कार्यालयात प्राप्त झालेल्या सुमारे ४० अर्जांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना शेतीपर्यंत यंत्रसामग्री पोहोचवणे तसेच उत्पादित मालाची वाहतूक सुलभ करणे हा या योजनेचा मुख्य हेतू असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
ग्रामस्थांनी सुचवलेल्या रस्त्यांमध्ये अडथळे असल्यास ते तातडीने दूर करून शासनाच्या निकषांनुसार प्रस्ताव तयार करावेत. विविध विभागांच्या समन्वयातून आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने रस्ते उभारून ही योजना प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन अध्यक्ष किशोर देसाई यांनी केले.
या बैठकीस भूमि अभिलेख, पंचायत समिती, जिल्हा परिषद बांधकाम, कृषी आदी विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.