गुढीपाडवा निमित्त कणकवलीत भव्य हिंदू नववर्ष स्वागत यात्रा ; शहर झाले भगवेमय

कणकवली ( मयुर ठाकूर ) : गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभारंभावेळी कणकवली शहरात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे गुरुवारी सायंकाळी भव्य आणि दिमाखदार शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवणारी ही यात्रा उत्साह, एकात्मता आणि सांस्कृतिक रंगांनी नटलेली होती. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्यामुळे संपूर्ण कणकवली भगवेमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

गेल्या काही वर्षांपासून शहरात हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची परंपरा सुरू असून यंदाही ती अधिक भव्यतेने साजरी करण्यात आली. यात्रेचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौकातून करण्यात आला.

यावेळी ढोल – ताशांचा गजर, लेझीम आणि झांजेच्या तालावर तरुणाईने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषेत सजलेले युवक – युवती, महिला, आबालवृद्ध आणि लहान मुलांनी यात्रेला विशेष रंगत आणली. यात्रेत महिलांची बाईक रॅली हे एक वेगळे आणि लक्षवेधी आकर्षण ठरले. दुचाकींवर भगवे झेंडे फडकावत पारंपरिक वेशात सहभागी झालेल्या महिला भगिनींचा उत्साह विशेष दखलपात्र होता. तसेच सिंधुगर्जना पथकातील युवक – युवतींनी ढोल – ताशांच्या गजरात वातावरण भारावून टाकले.

यात्रेत सादर करण्यात आलेले भारत माता तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे देखावे उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होते. भगवे ध्वज, पताका, चित्ररथ आणि भगवे फेटे परिधान केलेल्या सहभागीमुळे यात्रेची शोभा अधिकच वाढली.

तेली आळी परिसरात भगवे झेंडे आणि पताकांनी यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेली ही शोभायात्रा आप्पासाहेब पटवर्धन चौक, बाजारपेठ मार्गे विद्यामंदिराच्या पटांगणावर पोहोचली. त्यानंतर शिवारा मंदिराजवळ यात्रेचा समारोप करण्यात आला.

या भव्य स्वागत यात्रेद्वारे सामाजिक सलोखा, स्वच्छता आणि भारतीय संस्कृतीचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला. कणकवलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत नववर्षाचे स्वागत मोठ्या आनंदात आणि जल्लोषात साजरे केले.